पेट्रोल दरवाढ अन् मनस्ताप! तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटण्यास पुन्हा सुरूवात

नाशिक : पेट्रोलच्या दररोज वाढतच जाणाऱ्या दराने मंगळवारी (ता.१८) शहरात नवा उच्चांक गाठला. ९६ रुपये ३६ पैसे प्रतिलिटर इतका पेट्रोलसाठीचा दर तर ८६.०१ रुपये इतका डिझेलसाठीचा दर नोंदविण्यात आला. स्पीड पेट्रोल ९९.१९ रुपये तर स्पीड डिझेल ८९ रुपये प्रतिलिटरच्या घरात पोहचले. गत आठवड्यात विविध संघटनांनी पेट्रोलदरवाढीचा निषेध नोंदवित आंदोलन केले होते. आता शंभरीकडे चाललेल्या पेट्रोलदरामुळे नागरिकांच्या तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे.

पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी

कच्च्या मालाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे इंधनाचे दर वाढत असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र, सरकारने या दरवाढीमुळे सामान्य जीवनावर होणारा परिणाम विचारात घेऊन पेट्रोलचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शुक्रवारी शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल ९५.२९ रुपये तर डिझेल ८४.७४ रुपयांवर पोहचले होते. किमान या किमतीवर पेट्रोलचे दर स्थिर होतील, अशी आशा केली जात असताना बुधवारी (दि.१७) ९७ रुपयांच्या घरात पेट्रोलचे प्रतिलिटर दर पोहोचल्याने सरकारच्या इंधन विषयक धोरणांचा निषेध व्यक्त होत आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

ग्राहकांच्या नाराजीचा सामना पेट्रोल पंपचालकांनाच

सलग काही दिवसांपासून होणाऱ्या पेट्रोल दरवाढीमागील कारणे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,'इंधन दरवाढीमागे चार प्रमुख कारणांचा समावेश असतो. यात प्राधान्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड ऑईलचे वाढलेले दर, डॉलरशी असणारा विनीमय दर, इंधनांवर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून आकारले जाणारे कर आणि केंद्र सरकारकडून अवलंबिलेली दैनंदिन नियमित किंमत पध्दत. सद्यस्थितीत तेलाच्या क्षेत्रातील चालू घडामोडींचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रूड ऑईलवर होताना दिसून येतो आहे. मात्र, अनेक ठिकाणी इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या नाराजीचा सामना पेट्रोल पंपचालकांनाच करावा लागत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

आंतरराष्ट्रीय स्तरापासून विविध घटक कारणीभूत

इंधनाचे दर वाढण्यासाठी विविध कारणांचा विचार करावा लागतो. सद्यस्थितीत सामान्यांची इंधन दरवाढीमुळे होणारी होरपळ रास्त असली तरीही त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापासून विविध घटक कारणीभूत आहेत. याचा तपशील लक्षात न आल्याने अनेकदा पेट्रोल पंप चालकांनाच ग्राहकांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. असे महाराष्ट्र राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.