पेठच्या सुनंदाताईंचा नोकरी सोडून महिलांना स्वावलंबी करण्याचा वसा; मशरूम व्यवसायातून दिला रोजगार 

पेठ (जि.नाशिक) : दुर्गम, अतिदुर्गम भागातील उच्चशिक्षित तरुणी व महिला संसारात ‘चूल आणि मूल’ सांभाळूनच फाटलेल्या संसाराला शेतमजुरीतून ठिगळं लावत जीवन व्यतित करतात. मात्र, शिकलेल्या महिलांना उभारी देऊन शिक्षणाचे मोल करा आणि स्वबळावर उभ्या राहा, आनंदी जीवन जगा, हा संदेश देत माणदेशी फाउंडेशनच्या मार्गदर्शक सुनंदा भुसारे यांनी तरुणींना वेगवेगळ्या लघुउद्योगांचे प्रशिक्षण देत स्वावलंबी बनविले आहे. 

पेठच्या सुनंदा भुसारे यांनी दिले स्वावलंबनाचे धडे 
आदिवासी महिलांना स्थानिक रोजगार नाही. कारखानदारी नाही. शेती व्यवसायाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी व सुलतानी संकटाने हिरावून नेले. दर वर्षी आदिवासी भागात या ना त्या कारणाने शेतकरी, शेतमजूर नागविला जातो. या सर्व त्रासातून मुक्त करण्यासाठी सातारा येथील माणदेशी फाउंडेशनने पेठ तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा पुढाकार घेतला आहे. पेठ तालुक्याच्या मार्गदर्शक म्हणून सुनंदा भुसारे (एमए, डीएड) या महिलेने आपली नोकरी सोडून महिलांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

घर सांभाळून या व्यवसायातून पैसे मिळवितात
पेठ तालुक्यातील दुर्गम खेड्यांत जाऊन अनेकांना प्रशिक्षण दिले. आड बु., आसरबारी, गायधोंड, झरी, सावर्ना, बेहडापाडा या गावांतील महिलांना शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम उद्योग अशा अनेक छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिलांना व्यावसायिक बनविले आहे. आड बु. गावातील ९०० हून अधिक महिलांना मशरूम व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन बियाणे वाटप केले. एक ते दीड हजार रुपये गुंतवणूक करून महिलांनी दहा हजारांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे महिला घर सांभाळून या व्यवसायातून पैसे मिळवत आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

शिक्षणाने महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होतो. परिणामी, वेगवेगळ्या प्रशिक्षणातून गावातच रोजगार उपलब्ध होईल. शिकलेल्या मुली अथवा महिला उपजीविकेसाठी स्थलांतरित अथवा शेतमजुरीला जाणार नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून गरिबीवर मात करतील. -सुनंदा भुसारे, तालुका मार्गदर्शक, माणदेशी फाउंडेशन