पेस्ट कन्ट्रोल ठेकेदाराला भाजप-सेनेकडून पायघड्या; स्थायी समितीकडून दंड माफीचा ठराव 

नाशिक : महापालिकेच्या वादग्रस्त विषयावरून आमने-सामने उभे राहणाऱ्या सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष शिवसेनेची स्थायी समितीतील अनोखी युती ठेकेदाराला दंड माफीच्या निमित्ताने समोर आली आहे.

मे. दिग्विजय एन्टरप्रायजेस या पेस्ट कन्ट्रोल कंपनीला केलेला दंड स्थायी समितीने माफ केला आहे. विशेष म्हणजे शहरातील अस्वच्छतेचे निमित्त करून एका ठेकेदाराला चौकशीच्या फेऱ्यात गुंतविण्यासाठी आंदोलन केले जात असताना पेस्ट कन्ट्रोलच्या ठेकेदाराला करण्यात आलेली दंडमाफी चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासन स्थायीच्या ठरावावर काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

कळवळा भाजप-सेनेच्या दोन्ही सदस्यांना

शहरातील सहा विभागात डास निर्मुलन करणे, डासांचा प्रादुर्भाव रोखणे, कीटकनाशक व धूर फवारणी करण्याचे काम ऑगष्ट २०१६ पासून मे. दिग्विजय एन्टरप्राईजेसला देण्यात आले आहे. मुदत संपूनही सातत्याने दीड वर्षांपासून वाढ दिली जात असल्याने आधीच वादात सापडलेला पेस्ट कन्ट्रोलचा ठेका आता दंड माफीच्या निमित्ताने आणखी वादात सापडणार आहे. विशेष म्हणजे दंड माफी देण्यासाठी भाजपचे स्थायी समिती सदस्य कमलेश बोडके व शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांनी दंड माफीची शिफारस केली आहे. शिफारस करताना दोन्ही सदस्यांना पेस्ट कन्ट्रोलचे काम शहरात उत्तमरीत्या सुरु असल्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होण्याबरोबरच डेंगी, चिकन गुणिया या आजारांचे प्रमाण कमी झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. पेस्ट कन्ट्रोलचे काम करताना जीपीएस यंत्रणा बसविणे, कामावर असलेले कर्मचारी ट्रेसिंग न होणे, गैरहजेरी, उशिरा कामावर येणे आदी कारणांमुळे दिग्विजय एन्टरप्राईजेसला दंड आकारण्यात आला होता. परंतु, आकारण्यात आलेला दंड चुकीच्या पद्धतीने तर आहेच. त्याशिवाय कोविडच्या काळात चांगले काम करण्याबरोबरच आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याचा कळवळा भाजप-सेनेच्या दोन्ही सदस्यांना आला. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सदस्यांच्या दुहेरी भूमिका 

पूर्व व पश्‍चिम विभागात रस्त्यांची झाडलोट करण्याचे काम मे. वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीकडून कर्मचारी भरती करताना अनामत रक्कम घेणे, कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्ण न करणे आदी आरोप करण्यात आले. या विरोधात बोडके यांनी स्थायी समितीच्या सभेत आंदोलन देखील केले होते. एकीकडे वॉटरग्रेस विरोधात भूमिका घेताना दुसरीकडे मे. दिग्विजय एन्टरप्राईजेसला दंड माफी देण्याची केलेल्या शिफारशी वरून स्थायी समितीतील भाजप-शिवसेनेची अर्थपूर्ण मैत्री उघड होण्याबरोबरच सदस्यांची दुहेरी भूमिका समोर आली आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच