पोलिसपाटलाची सोडली नोकरी; शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रिय

नैताळे (जि.नाशिक) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर नैताळे व परिसरातील शेतकऱ्यांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आंदोलन केले होते. या आंदोलनप्रसंगी पोलिसपाटील आत्माराम बोरगुडे यांनी शासनाची बाजू न घेता शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली. याबाबत  बोरगुडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र या नोटिशीला बोरगुडे यांनी उत्तर न देता आपला स्वाभिमान राखून पोलिसपाटीलपदाचा राजीनामा देत निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पोलिसपाटीलपदाचा राजीनामा
महसूल प्रशासनातर्फे नैताळे (ता. निफाड) येथील आत्माराम बोरगुडे यांची पोलिसपाटील म्हणून नेमणूक केलेली आहे. मागील दहा वर्षांपासून ते पोलिसपाटील म्हणून नागरिक व शासनाची सेवा करत आहेत. 
याचदरम्यान राज्यात शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव राज्यात संप पुकारला असता नैताळे येथील शेतकऱ्यांनीदेखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आंदोलन केले होते. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना त्या वेळेस लाठीचार्ज करावा लागला. या वेळी  बोरगुडे स्वतः एक प्रगतिशील शेतकरी असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका बजावली. त्यामुळे प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

या वेळी शेतकरीपुत्र असल्याने बोरगुडे यांनी आपला स्वाभिमान राखत नोटिशीला कोणतेही उत्तर न देता पोलिसपाटीलपदाचा राजीनामा देत माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यापुढील काळात आपण पक्षात राहून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे बोरगुडे यांनी सांगितले. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद