पोलिसांचा खबरी समजून तरुणाचा खून; कारवाईला दिरंगाई अन् तरुणाचा निष्पाप बळी

नाशिक : घडलेल्या वादाची भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. त्याचवेळेस संशयितांवर कारवाई झाली असती, तर त्यांचा पुन्हा वाद झाला नसता. आकाश रंजवेचे प्राण वाचले असते, अशी चर्चा परिसरात सुरू होती.  

पोलिसांच्या खबरी असल्यावरून तरुणाचा खून 

तक्रारदार करण लोट (वय २३, रा. महालक्ष्मी चाळ) सोमवारी (ता. ८) रात्री आईसोबत द्वारका भागात शतपावली करीत होता. संशयित विशाल बेनवाल, आकाश रमेश टाक, अभय अशोक बेनवाल त्याच्याजवळ आले. हप्ता देत नाही आणि पोलिसांना आमची माहिती देतो, यावरून करणबरोबर वाद घालून मारहाण केली. त्याने भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. नंतर करणचा भाऊ अर्जुन लोट, आकाश रंजवे, त्याची आई जिल्हा रुग्णालयात गेली. रात्री अकराच्या सुमारास उपचार करून परतले. वडाळा नाका वाल्मीक मंदिराजवळ चौघे रिक्षातून उतरले. संशयित आकाश बेनवाल, पवन टाक, सतीश टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरीश पवार, मनीष डुलगज, शिवम पवार त्यांच्या अंगावर धावून आले. त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले. जखमी करण लोट आणि आकाश रंजवे जीव वाचविण्यासाठी द्वारका चौकीच्या दिशेने पळाले. संशयितांनी त्यांना द्वारका चौकीमागील सुलभ शौचालयाजवळ गाठले. करण कसाबसा वाचत द्वारका चौकीत गेला व तेथील पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोचतील, तत्पूर्वी संशयितांनी आकाश रंजवेला चाकू भोसकून जखमी करून पळ काढला. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

परिसरात तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त तैनात

मुख्य संशयित विशाल बेनवाल सराईत असून, त्यास तडीपार केले आहे. तरीही त्याचा शहरात वावर होता. खून मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला असला, तरी वादाची सुरवात भद्रकालीत झाल्याने भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पवन टाक आणि तक्रारदार करण लोट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत रंजवेवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयितांवर कठोर कारवाई व फरार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी मृताच्या नातेवाइकांनी भद्रकाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या मांडला. सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना आणि वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी जमावाची समजूत काढल्यानंतर जमाव माघारी फिरला. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

सहा संशयित ताब्यात 
माहिती मिळताच भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भद्रकाली गुन्हे पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्‍वर मोहिते, भगवान जाधव, रमेश कोळी, सचिन म्हसदे, सागर निकुंभ, लक्ष्मण ठेपणे, नाना जाधव, कय्यूम सय्यद, मन्सूर शेख, गोरख साळुंके, संजय पोटिंदे यांनी अभय बेनवाल, पवन टाक, सतीश टाक, आकाश टाक, मनीष डुलगज, निखेलेश्‍वर टाक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार (एमएच १५, बीएन १२१) जप्त केली आहे. विशाल बेनवाल, शिवम पवार, हरीश पवार फरारी झाले आहेत. 

...अन्‌ प्राण वाचले असते 
सोमवारी (ता. ८) साडेनऊच्या सुमारास संशयित पवन टाक याचा भाचा अभय बेनवाल याचा अर्जुन लोट याच्याशी वाद झाला. करण लोट, अर्जुन लोट, आकाश रंजवे यांनी भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली. त्याचवेळेस संशयितांवर कारवाई झाली असती, तर त्यांचा पुन्हा वाद झाला नसता. आकाश रंजवेचे प्राण वाचले असते, अशी चर्चा परिसरात सुरू होती.  

शोधासाठी पथक रवाना

पोलिसांचा खबरी असल्याचा वादावरून आकाश संतोष रंजवे याचा द्वारका भागात खून झाला. याबाबत भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, तीन संशयित फरारी झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाली आहेत.