पोलिसांचा प्रभावच गुन्हेगारीला आळा घालू शकेल – छगन भुजबळ

येवला (जि.नाशिक) : चांगल्याचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी. तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

भुजबळ : येवला तालुका पोलिस ठाणे इमारतीचे लोकार्पण 

भुजबळ म्हणाले, की जिल्हा शेती व्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारी वर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन गावांचा विकास साधावा. या संकुलात आजपर्यंत उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, तालुकास्तरीय प्रशासकीय इमारत (तहसील कार्यालय), पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद इमारत, फलोत्पादन अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय, वनक्षेत्रपाल कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, दुकान निरीक्षक कार्यालय, रेशीम उद्योग कार्यालय, बहुउद्देशीय हॉल इत्यादी इमारती पूर्ण होऊन कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यात पोलिस ठाण्याचा समावेश झाला असून, राहिलेली कामे लवकरच पूर्ण केली जातील, असेही भुजबळ यांनी या वेळी सांगितले. 

अशी आहे इमारत... 
शहरात विखुरलेल्या स्वरूपात अडगळीच्या ठिकाणी व अपुऱ्या जागेत तालुका पोलिस ठाणे कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलिस ठाणे इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे एक कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ चार हजार २५० चौरसफूट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलिस ठाणे इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एसएचओ कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधनगृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष, रेकॉर्ड रूम, दिव्यांगांसाठीचा रॅम्प तसेच इतर सोयी-सुविधा असणार आहेत.  

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

येथील प्रशासकीय संकुलात तालुका पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक समीरसिंग साळवे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच