पोलिसांच्या नाकावर टिच्चून चहाच्या टपरीवरील विदारक चित्र! VIDEO सोशल मिडियावर व्हायरल

सिडको (नाशिक) : सिडकोतील तरुणाई कुत्ता गोलीच्या अधीन होत असल्याचा खळबळजनक प्रकार ‘सकाळ’ने समोर आणला. आता अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने औद्योगिक वसाहतीमधील एका चहाच्या टपरीआड देशी दारूची सर्रास अवैध विक्री होत असल्याचे विदारक चित्र येणाऱ्या-जाणाऱ्यांना बघायला मिळत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याचा VIDEO सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

चहाच्या टपरीत अवैध दारूची विक्री , video व्हायरल

दुसरीकडे अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंबड पोलिसांच्या नाकावर टिच्चून अंबड औद्योगिक वसाहतीतील एका चहाच्या टपरीत राजरोस अवैधरीत्या देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याकडे पोलिस प्रशासन डोळेझाक करताना दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा प्रकार एका लोकप्रतिनिधीच्या वरदहस्ताने सुरू असल्याचे बोलले जात असून, याबाबतची सत्यता समोर आणण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

अंबड पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी 

या संदर्भात अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कमलाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते या संदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तरीदेखील याबाबत गोपनीय शाखेतर्फे शोध घेऊन या प्रकारात सत्यता आढळल्यास नक्कीच कारवाई करू, असे सांगितले. हा प्रकार दिवसाढवळ्या राजरोस मुख्य रस्त्याच्या कडेला सुरू असतानादेखील पोलिसांना माहिती नसावा, याबाबत नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ