पोलिस ठाण्यातील जप्त वाहने ‘तो’ थेट पोहचवतो मालकापर्यंत! सुमारे दोनशे ते तीनशे मालकांचा घेतला शोध

नाशिक : शहर-जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात बऱ्याच वर्षांपासून जप्त केलेल्या तसेच अपघातातील वाहनाच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत ते वाहन पोचविण्याचे आगळेवेगळे कार्य काझीबाबा नावाची व्यक्ती करत आहे. चार वर्षांत त्यांच्याकडून सुमारे दोनसे ते तीनशे दुचाकीच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येऊन पोलिसांच्या माध्यमातून त्या परत केल्या आहेत. 

पोलिस ठाण्यातील जप्त वाहने मालकापर्यंत पोचविणारा अवलिया 

काझीबाबा उदरनिर्वाहसाठी भंगार व्यवसाय करतात. शहर-जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या बेवारस मोडकळीस असलेली वाहने शासकीय नियमानुसार लिलावातून घेत असतात. व्यवसाय करताना त्यांच्या लक्षात आले, की काही वाहने बेवारस असली तरी काहींचे मालक तर असतील. मग त्या विचारातून त्यानी २०१७ मध्ये गरीब नवाज सामाजिक संस्था निर्माण केली. त्या माध्यमातून त्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यास सुरवात केली.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

सुमारे दोनशे ते तीनशे वाहने मूळ मालकांना परत

वाहनांचे चेसी आणि इंजिन नंबरवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनांची माहिती घेऊन मालकांशी संपर्क केला जात. त्यांनी वाहने घेण्यास सहमती दाखविली, की वाहन परतव्याची संबंधित पोलिस ठाण्याची कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्यांच्या ताब्यात वाहने दिली जात. चार वर्षांत त्यांच्याकडून सुमारे दोनशे ते तीनशे वाहने मूळ मालकांना परत केली. पहिल्या वेळेस जेव्हा त्यांनी पहिली दुचाकी मूळ मालकास परत केली. त्यावेळेस वाहनधारकांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान बघता त्यांना पुढेही या कार्यात सातत्य ठेवण्याचे ठरविले. तेव्हापासून अविरत स्वखर्चातून ते कार्य करत आहे. त्यानिमित्ताने ते स्वतः विविध पोलिस ठाण्यात जाऊन तेथील वरिष्ठ अधिकारी आणि मुद्देमाल कारकूनकडून बेवारस वाहनांची माहिती घेऊन त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेतात. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

पोलिसांनाही महसूल 
दरम्यान, ज्या वाहनांचे मालकच नाही, त्या बऱ्याच वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत किंवा मूळ मालकही वाहने घेऊन जाण्यास तयार नाही. अशा वाहनांचे भंगार लिलावच्या माध्यमातून घेत त्यावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यामुळे मूळ मालकांना तर त्याचे वाहन मिळण्यास मदत होत आहे. शिवाय पोलिस ठाण्यांना या भंगार वाहनांमुळे आलेले बकाल स्वरुप दूर होण्यासही मदत होत आहे. पोलिस विभागाच्या महसुलातही त्यामुळे वाढ होत आहे. 

 

अशा प्रकारचे आगळेवेगळे समाजकार्य करण्यास वेगळा आनंद मिळतो. भविष्यातही असे कार्य करत राहणार आहे. -काझीबाबा