पोलिस निरीक्षकावरच काळाचा घाला; जागीच ठार, मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात

वाडीवऱ्हे (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघातात मुंब्रा पोलिस ठाण्यात निरीक्षक यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील भीषण अपघात
रविवारी (ता. १४) सायंकाळी आठच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळील रायगडनगर परिसरात नाशिककडून येणारी अर्टिगा कार (एमएच ०२, डीडब्ल्यू ७०६६)ची आणि अज्ञात मालवाहू वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात अर्टिगामधील पाच जण जखमी झाले. त्यांना जगद्‍गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी पांडुरंग चिंतामणी खांडवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चार जखमींवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

पोलिस निरीक्षकावरच काळाचा घाला
दरम्यान, मृत पांडुरंग खांडवी (वय ४५) मुंब्रा पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते कुटुंबासह त्यांच्या गावी धार्मिक कार्यक्रमासाठी आलेले होते. कार्यक्रम आटोपून ते पुन्हा मुंबईकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघतात त्यांची पत्नी व दोन मुलेदेखील जखमी झाली आहेत. जखमींमध्ये मीना पांडुरंग खांडवी, वैष्णवी पांडुरंग खांडवी, जय पांडुरंग खांडवी आणि विनायक रघुनाथ सानप यांचा समावेश आहे. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक फरारी झाला.

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

अपघाताचा गुन्हा दाखल

मुंबई-आग्रा महामार्गावरील रायगडनगरजवळ झालेल्या अपघतात एकजण ठार, चार जण गंभीर जखमी झाले. ठार झालेले पांडुरंग खांडवी मुंब्रा येथे पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होते. मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांचे ते काका होते. वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक नितीन पाटील, मोरे, देवीदास फड तपास करीत आहेत.