पोलिस निवासस्थान की थर्ड डिग्री? जोखीम पत्करत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांना शिक्षा

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन जोखीम पत्करत सतत कर्तव्य बजावणाऱ्या पिंपळगाव बसवंत पोलिस कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे.

जणू थर्ड डिग्रीचीच शिक्षा

५० वर्षे जुन्या बांधकामांमुळे मोडकळीस आलेली घरे, पावसाळ्यात गळणारे छप्पर, परिसरातील बकालपणामुळे साप-विंचूकाट्याची सतत भीती अशा दुरवस्था झालेल्या घरांमध्ये पोलिसांचे कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहे. हे पाहता या घरांमध्ये वास्तव्य म्हणजे जणू थर्ड डिग्रीचीच शिक्षा पोलिसांना झाली आहे. 

१५ ते ५० कुटुंब वास्तव्यास
पिंपळगाव हायस्कूल प्रवेशद्वारालगतच्या जागेत ४० घरांची वसाहत उभारलेली आहे. बांधकाम होऊन ५० वर्षे उलटल्याने ती अत्यंत जुनाट झाली असून, बांधकामानंतर निवासस्थानाच्या दुरुस्तीकडे व रंगरंगोटीकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आता निवासस्थानाची बकाल अवस्था झाली आहे. घरावरील जुन्या पद्धतीचे कौले, पत्रे जागोजागी फुटल्याने पावसाळ्यात सर्वच घरात गळती लागते. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने डबके तुंबतात. त्यातून डास उत्पत्ती होऊन आरोग्य धोक्यात येते.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

घरांच्या जुन्या झालेल्या भिंतींना तडे गेले असून, काही भिंती पडल्या आहेत. येथील ४० पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने तेथे राहणाऱ्या पोलिस कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. यातील एकही घर राहण्यायोग्य उरले नाही. त्यामुळे केवळ १५ ते ५० कुटुंब येथे वास्तव्यास असून, अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून भाडेतत्त्वावरील घरात राहावे लागत आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

प्रस्ताव पाठवून लोटली तीन वर्षे 
तीन पोलिस अधिकारी व ५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची राहण्याची सोय होईल या दृष्टीने वसाहतीच्या नूतनीकरणासाठी २०१८ मध्ये वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सर्व सुविधांनी युक्त नव्या निवासी संकुल बांधकामाची पिंपळगावला गरज आहे.