पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ

पोलीस भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गृह विभागाच्या गोंधळामुळे नाशिक ग्रामीण पोलिस भरतीतील मैदानी चाचणीला तृतीयपंथी उमेदवार मुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणीबाबत अधिकृत सुचना प्राप्त न झाल्याने भरती प्रक्रिया राबविणारे अधिकारीही बुचकळ्यात सापडले होते. मात्र, या सर्व गोंधळात तीन तृतीयपंथी उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जाता न आल्याने त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नोव्हेंबर- २०२२ मध्ये बहुप्रतिक्षेत पोलीस भरतीला अखेर मुहूर्त सापडला होता. नाशिक ग्रामीणसाठी तीन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले होते. २ जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली होती. तेव्हापासून तृतीयपंथी उमेदवारांच्या निकषांची प्रतीक्षा अधीक्षक कार्यालयात होती. मैदानी चाचणीच्या वेळापत्रकानुसार तीन तृतीयपंथी अर्जदारांना शुक्रवारची (दि. २०) वेळ देण्यात आली होती. मात्र, गृह विभागाकडून त्यांच्या चाचणीचे आदेशच प्राप्त न झाल्याने तिन्ही उमेदवारांना चाचणीसाठी न येण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे या उमेदवारांना मैदानी चाचणीपासून दूर रहावे लागले.

दरम्यान, पोलीस भरतीसाठी महिला व पुरूष उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. मैदानी चाचणीअंती १२ हजार २२६ उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांना आता लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ appeared first on पुढारी.