पोलिस वसाहतीच्या जागेवर होणार प्रशिक्षण केंद्र; प्रशासकीय हालचालींना वेग

नाशिक रोड : येथील पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस साडेसात एकर जागेमध्ये पोलिस वसाहतीच्या जागी आता प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र होणार असल्याचे समजते. येत्या वर्षभरात पोलिस वसाहती जमीनदोस्त करून या ठिकाणी महसूल विभागाच्या संबंधित साडेसात एकर जागेमध्ये भव्यदिव्य प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येणार असल्याचे महसूल आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

नाशिकच्या वैभवात भर पडणार

नाशिकरोड येथे ब्रिटिशांच्या काळापासून पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. पोलिस ठाणे व महसूल आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये असलेल्या या वसाहतीतील घरे आता जुनी व खिळखिळी झाली आहेत. यामुळे या साडेसात एकर जागेत महसूल विभाग व शासकीय कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात चार भव्यदिव्य ट्रेनिंग हॉल, बाहेरगावच्या शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी होस्टेल, रूम, अल्पोपाहार, जेवण, हायटेक आणि डिजिटल क्लासरूमची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंबंधी बांधकाम विभाग लवकरच कार्यवाही करणार असून, नाशिक रोड परिसरात जागतिक बँकेच्या सहकार्याने बांधलेले तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आणि त्याबरोबरच प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र होणार असल्याने नाशिकच्या वैभवात भर पडणार आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

विकासाला चालना 

नाशिक रोड भागातच ‘मीत्रा’ या संस्थेने नुकतेच बांधलेले भव्यदिव्य प्रशिक्षण केंद्र लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार असून, या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांसह तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय संस्थांसाठी प्रशिक्षणाची सुविधा असणार आहे. या केंद्राच्या अगदी समोरच्या जागेत हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठीचे प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्यामुळे या भागातील रोजगार, दळणवळण आणि आर्थिक, भौतिक व सामाजिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप