पोळ कांदा काढणीसाठी सज्ज! १०-१५ दिवसांत बाजारात विक्रीला येणार

येवला (नाशिक) : यंदा वातावरणामुळे कांदा रोपे सडले, लागवड झालेली कांदेही अर्ध्यावर मृत झाले, त्यात भावही तेजीत होता. मात्र रोपे नसल्याने पारंपरिक लागवडीच्या पद्धतीवर पर्याय शोधत शेतकऱ्यांनी कांदे पेरणीचा पर्याय निवडला असून, जिल्ह्यात येवला, चांदवड व कसमादे भागात अंदाजे हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कांदा पेरणी झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला तो काढणीलायक झाला असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरलेला कांदा या १०-१५ दिवसांत बाजारात विक्रीला येणार आहे.

रोपे नसल्याने येवला, चांदवड, मालेगाव भागात प्रयत्न

सततच्या पावसामुळे पोळचे रोप, कांदे, तसेच रांगडा व उन्हाळ कांद्यांच्या रोपांची वाताहत झाली. रांगडा, लाल व उन्हाळचे रोप नसल्याने, बियाण्यांचा तुटवटा निर्माण झाल्याने मोठी समस्या उभी राहिली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा यंत्राने पेरणीकडे कल वाढला. सायगाव येथील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केलेली असून, काहींचा कांदा काढणीला आला आहे. प्रगतिशील शेतकरी भागूनाथ उशीर यांनी पोळ कांदा उत्पादनावर निर्सगामुळे झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करित रेंडाळा-ममदापूर येथील शेतात दोन एकर पोळ कांद्याची पेरणी केली होती. तालुक्यातील व परिसरातील पोळ लाल कांद्याची रोप, झालेली कांदालागवड संपूर्णपणे नष्ट होत असताना पेरलेल्या पोळ कांद्याचे नुकसान त्या प्रमाणात कमी झाले. सर्व बुरशीजन्य रोगांशी सामना करत ७५ टक्के कांदे सुरक्षित राहिले आहेत.

डोंगळ्याला कांदे बुकिंग..!

या वर्षी कांदा बियाण्यांचे चढलेले भाव व तुटवडा या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचा पुढील वर्षासाठी कांदा बियाणेसाठी डोंगळे घरीच लावून कांदा बी तयार करण्याकडे कल असतो. मात्र कांदे नसल्याने व पेरलेले कांदे बियाणे हे विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांदा वाणाचे असल्याने डोंगळे लावण्यासाठी कांदा निघण्याच्या अगोदरच १५ दिवस डोंगळे लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून आगाऊ कांदा खरेदी बुकिंगचा आग्रह सुरू झाला आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले बसवंत ७८० जातीचे बियाणे पेरले असून, या वर्षी पेरलेल्या कांद्यापासून ४५ ते ५० क्विंटल एकरी कांदा उत्पादन होईल, अशी खात्री आहे. लागवड केलेल्या कांद्यांच्या तुलनेत पेरलेल्या कांद्याचा उत्पादनखर्च ३० टक्क्यांनी कमी आहे. - भागूनाथ उशीर, प्रयोगशील शेतकरी, उत्तर-पूर्व भाग, येवला

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?