पोषण आहार योजनेचे मानधन स्वयंपाकीच्या खात्यावर; स्वयंपाकी महिलांनी केले समाधान व्यक्त

नामपूर (जि.नाशिक) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधन आता दरमहा दहा तारखेपर्यंत थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंपाकी महिलांनी समाधान व्यक्त केले. 

पोषण आहार योजनेचे मानधन स्वयंपाकीच्या खात्यावर 

शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो. यासाठी शाळांना निधीही पुरविण्यात येत असतो. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्वयंपाकी, मदतनीस शाळांमधून पोषण आहार शिजविणे, आहारवाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत स्वयंपाकी, मदतनीसांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. 
स्वयंपाकी महिलांना यापूर्वी दरमहा एक हजार रुपये मानधन अदा केले जात होते. प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार महागाईमुळे एप्रिल २०१९ पासून दरमहा दीड हजार रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

शालेय शिक्षण विभाग; जिल्हास्तरावर मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रक 

जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रकच तयार करून देण्यात आले असून, त्याप्रमाणे बॅंक खात्यात थेट मानधन जमा करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्रप्रमुखांनी दरमहा ३ तारखेपर्यंत मानधनाची देयके तालुका कार्यालयास सादर करणे आवश्‍यक आहे. तालुका कार्यालयाकडून देयकांची तपासणी करून एकत्रित देयके जिल्हा परिषदेस बॅंक यादीसह सादर करण्यासाठी ५ तारखेपर्यंतची मुदत आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश
प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत स्वयंपाकी, मदतनीस यांना मानधन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आगाऊ स्वरूपात निधी देण्यात येत असतो. मात्र, तरीही मानधन वेळेवर अदा केले जात नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. तसेच काही शाळांमध्ये पोषण आहार योजनेत अपहार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच स्वयंपाकी, मदतनीसांनी स्वत: व विविध संघटनांनी नियमितपणे मानधन मिळण्याबाबतची मागणी शिक्षण संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे, दूरध्वनीद्वारे केली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 

अनेक वर्षांपासून शाळेत तुटपुंज्या मानधनावर आहार शिजविण्याचे काम करीत आहे. अजूनही थेट खात्यावर मानधन मिळत नाही. कोरोना काळात शाळा बंद असतानाही मानधन मिळाले आहे. - रख्माबाई वाघ, पोषण आहार स्वयंपाकी