प्रचंड दहशत, मानसिक त्रास झाला असह्य; घंटागाडी कामगाराचा मृत्यू 

नाशिक : नाशिक रोड विभागातील घंटागाडीवर काम करणारे कर्मचारी केशव साळवे यांचा घंटागाडी ठेकेदाराच्या मानसिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचा आरोप घंटागाडी कामगारांचे नेते महादेव खुडे यांनी केला.

मानसिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिक रोड भागातील कामगार गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड दहशतीखाली काम करत होते. कामगारांनी किमान वेतन मागू नये म्हणून त्यांना दहशतीखाली ठेवले जात होते. संघटनेबरोबर राहून आपले अधिकार मागू नये म्हणून त्यांच्यावर दडपण आणले जात आहे. याच काळात चार कामगारांना गाडी भरल्यावर केवळ फोन केला नाही म्हणून कामावरून काढण्यात आले. मृत केशव साळवे यांना कारण नसताना एका लेबरवर काम करायला लावणे, गाडी बदलणे, दोन फेऱ्या करायला लावणे, असे प्रकार नाशिक रोड विभागातील ठेकेदाराकडून करण्यात आले. साळवे यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याने मानसिक आघात होऊन त्या झटक्यात ते आजारी पडले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा खुडे यांनी आरोप केला.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

कारवाई होऊन नुकसानभरपाई द्या

यासंदर्भात पोलिसांनी तक्रार करण्यास टाळाटाळ केली. कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होऊन नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!