नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याबाबत अद्यापही उमेदवारीबाबत संभ्रम कायम असतानाच महायुतीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपला सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह केला आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणार असल्याने त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्यपातळीवरून आल्या आहेत.
बदलत्या काळानुसार प्रचाराचे अनेक नवनवे तंत्रज्ञान विकसित होत असतानाच सोशल मीडिया अत्यंत प्रभावी असे माध्यम बनले आहे. मतदारांच्या हातामध्ये असलेल्या फोनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी वेगवेगळी धोरणे निश्चित केली जात आहेत. याबाबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने नाशिक जिल्ह्यामध्ये स्वत:चे जाळे विकसित केले आहे. त्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाणे सोपे होणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सुजित सोनवणे यांनी जिल्ह्यातील तालुका, गट, ग्रामपातळीवर सोशल मीडियाचे संघटन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या विविध मंत्र्यांमार्फत केलेल्या कामाची माहिती जिह्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत तळागळापर्यंत व्हाॅट्सअॅप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील सोशल मीडिया सेलची बैठक मुंबईमध्ये पार पडली होती. त्यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सोशल मीडियाची बांधणी, त्याची मार्गदर्शक तत्त्वे याबाबत मार्गदर्शन केले होते. यामध्ये प्रामुख्याने महायुतीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक लोकापयोगी कामांचा धडाका लावला. अनेक विकासकामे केली आहेत, त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावी. त्यासोबतच सोशल मीडियावर व्यक्त होताना काही लोक खालच्या स्तरावर जाऊन गोष्टी मांडतात. असे प्रकार आपल्यापैकी कुणीही करू नये, अशादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
——
———–
The post प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह appeared first on पुढारी.