प्रजासत्ताक दिनापासून शहरात मनपाची बससेवा; परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय

नाशिक : अनेक वर्षांपासून सुरू होणार म्हणून वाट पाहणाऱ्या नाशिककरांची शहर बससेवेची इच्छा लवकरच पूर्ण होणार असून येत्या २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्यापूर्वी १५ जानेवारीला ट्रायल घेतली जाणार आहे. परिहवन समितीच्या सदस्यांची गुरुवारी (ता. २६) बैठक झाली. त्यात बससेवा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. 

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा तोट्यात असल्याने तोट्याची रक्कम महापालिकेने अदा करावी किंवा बससेवा सुरू करावी, अशी मागणी केली होती. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला बससेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने सेवा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. प्रारंभी शहरात सहाशे बस चालविण्याचे नियोजन होते. परंतु तोटा अधिक वाढत असल्याने ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ या तत्त्वानुसार चारशे बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद व महापालिकेला होणारा तोटा लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात अडीचशे बस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अशी मिळेल बस सेवा

बससेवेसाठी महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, बस पुरविण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक व वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. तिकीट वसुली ठेकेदारमार्फत केली जाणार असून, किलोमीटरमागे बस ऑपरेटर कंपन्यांना ठरविक रक्कम अदा केली जाणार आहे. १०० सीएनजी, १०० डिझेल, तर ५० इलेक्ट्रॉनिक बस चालविण्याचे नियोजन आहे. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने बससेवेला विलंब झाला. आता नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

२६ जानेवारीचा मुहूर्त 

आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची गुरुवारी बैठक झाली. महापौर सतीश कुलकर्णी ऑनलाइन, तर स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शहर अभियंता संजय घुगे बैठकीला उपस्थित होते. बससेवा सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा, नियंत्रक, परिवहन सेलची नियुक्ती, बससेवेसाठी ऑडिटर नियुक्त करणे, शासनाकडून तिकिटांचे दर निश्‍चित करणे, आरटीओकडून परमिट मिळविणे, बस डेपो यासंदर्भात आढावा घेण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट न आल्यास २६ जानेवारीपासून पाच टप्प्यांत सेवा सुरू केली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात पन्नास बस सुरू करण्याचे नियोजन आहे. 

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न 

बससेवा सुरू झाल्यानंतर ती बंद करता येणार नाही. ऑपरेटरला करारानुसार पैसे अदा करावे लागणार आहेत. बससेवा सेवावर्गात मोडत असल्याने नफा-तोट्याचा विचार करता येणार नाही. त्यामुळे बससेवेसाठी उत्पन्नाचे मार्ग शोधण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. बसवर जाहिराती, इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड, डेपोमध्ये पाणी, उपाहारगृह, फळविक्रेत्यांना स्टॉल उपलब्ध करून देणे या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

२६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. कोरोनाची दुसरी लाट न आल्यास पूर्ण क्षमतेने सेवा सुरू केली जाईल. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापलिका