“प्रत्येक नाशिककर असेल साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष” – पालकमंत्री छगन भुजबळ

कुसुमाग्रजनगरी (नाशिक) :  येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष प्रत्येक नाशिककर असेल, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ३१) येथे स्पष्ट केले. तसेच सामाजिक प्रश्‍न मांडणाऱ्या साहित्यिकांच्या समावेशातून सगळ्या समाजाला हे संमेलन आपले वाटेल, अशी काळजी घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

राजकारणी म्हणून संमेलनाचे व्यासपीठ व्यापण्याचा आमचा इरादा नाही. मी स्वतः नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सांगून  भुजबळ यांनी आम्ही वाचक असल्याने काम करण्याची मिळालेली संधी चांगली असल्याबद्दलचा आनंदभाव व्यक्त केला. त्याचबरोबर आमच्यात पक्षभेद नाहीत, आम्ही सगळे संमेलनासाठी खंबीरपणे उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून ५० लाखांची देणगी देण्याची विनंती करत नाशिकमधील इतरांची मदत घेतली जाईल, असे सांगितले. कोरोना संपला नसल्याने त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागेल हेही सांगायला ते विसरले नाहीत. वर्षानुवर्षे साहित्यिकांच्या लक्षात राहील, असे नाशिकचे संमेलन होईल, असा विश्‍वास भुजबळ यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

घरोघरी उभारा गुढी सहभागी अन्‌ सन्मानाची 

संमेलनाचा उत्साह आणि आनंद केवळ साहित्य संमेलनस्थळी न राहता पूर्ण शहरात त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. त्यासाठी प्रत्येक नाशिककरांनी संमेलन काळात आपल्या घरावर सहभाग आणि साहित्यिकांच्या सन्मानाची गुढी उभारावी, असे सांगून भुजबळ यांनी काम करणाऱ्यांना समित्यांमध्ये स्थान देण्याची सूचना केली. त्यांनी महसूल, वीज वितरण कंपनी, पोलिस, जिल्हा परिषद, महापालिका, आरोग्य, अग्निशमन दलातर्फे काम करणाऱ्या समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि त्यांना निमंत्रक म्हणून सहभागी करावे, असे सांगितले. ते म्हणाले, की सूचना केली आणि ती मान्य झाली नाही, तर राजकारण केले, असे कुणीही म्हणू नये. वाद-विवाद टाळावेत. काही सूचना अथवा विचार असल्यास थेट मला सांगा. मात्र, कुणीही निदर्शने करू नयेत ही हात जोडून विनंती आहे. संमेलनानिमित्त शहरात येणाऱ्या प्रत्येकाची उत्तम व्यवस्था होईल, याची काळजी घेत असताना उत्सवी स्वागतासाठी शहरभर कमानी, पताका लावाव्यात. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने गोखले एज्युकेशन संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात झालेल्या बैठकीत  भुजबळ बोलत होते. महापौर, पोलिस आयुक्त दीपक पांडे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, मधुकर झेंडे, माजी आमदार जयवंत जाधव, महापालिकेचे अप्पर आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपायुक्त मनोज घोडे- पाटील, डॉ. मो. स. गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने, लक्ष्मण सावजी, नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, डॉ. कैलास कमोद, दिलीप खैरे, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, विनायक रानडे, रंजन ठाकरे, संजय चौधरी, मुकुंद कुलकर्णी, मिलिंद गांधी, संजय करंजकर, सुभाष पाटील, ॲड. धर्मेंद्र चव्हाण, प्रा. संजय शिंदे, शहरातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. संमेलनासाठी महापालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महापौरांनी दिली. जातेगावकर यांनी संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार

कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा 

डॉ. गोसावी यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी संमेलनानिमित्त नाशिकची संस्कृती जगासमोर यावी तसेच आरोग्यविषयक परिसंवाद व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनामुळे ज्ञानाधिष्ठित समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मिळणारे कोंदण महत्त्वाचे असेल, असेही त्यांनी सांगितले. संमेलनानिमित्त नाशिकदर्शनसाठी खासगी बसगाड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी सूचना केली. त्यावर श्री. भुजबळ यांनी शहरात बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे जाहीर केले. डॉ. रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर अशा शास्त्रज्ञांना आमंत्रित करून ‘मी शास्त्रज्ञ कसा घडलो’ हा संवाद विद्यार्थ्यांशी घडवला जावा, असेही सूचविण्यात आले. नाटककार दत्ता पाटील यांनी विचारांची देवाणघेवाण करणारे संमेलन अशा दिशेने कर्मकांडाला फाटा देऊन सुरवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या ८३ ग्रंथालयांचा प्रातिनिधिक सन्मान करण्याची सूचना उदय रत्नपारखी यांनी केली. लक्ष्मीकांत कोतकर यांनी आदिवासी लोककला, लोकसंस्कृती, साहित्याला संमेलनात स्थान मिळावे, असे सांगितले. वेदश्री थिगळे आणि डॉ. प्रतिभा जाधव यांनी महिलांचा सहभाग वाढवत सर्वसमावेशक संमेलन व्हावे, असे सुचविले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यावर भर दिला. उपस्थितांकडून आलेल्या सूचना पाहून श्री. भुजबळ यांनी कार्यक्रमपत्रिका निश्‍चितीबद्दल मराठी साहित्य महामंडळ निर्णय घेईल, असे सांगून सूचनांचा पडलेला पाऊस पाहता, नाशिकसाठी स्वतंत्र संमेलन घ्यावे लागेल, असे दिसत असल्याचे नमूद केले. 

बैठकीतील ठळक मुद्दे 

-ज्ञानेश सोनार ः साहित्यसोबत व्यंग्यचित्र हातात हात घालून चालते. त्यामुळे चित्रप्रदर्शन, प्रात्यक्षिक असे उपक्रम संमेलनात समाविष्ट करावेत 
-संतोष हुदलीकर ः पाहुण्यांची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत. कवी कट्टा आणि कथा उपक्रमाची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. संमेलनात आपल्या परंपरांचा समावेश व्हावा. 
-वसंत खैरनार ः प्रकाशक, लेखकांच्या निर्मिती वाचकांपर्यंत दुकानदार पोचवतात. त्यामुळे साहित्याची विक्री करणाऱ्यांचा सहभाग घेतला जावा 
-विलास पंचभाई ः कामगारांसाठी दालन व्हावे. परिसंवादात सहभाग असावा. प्रकाशनासाठी स्वतंत्र दालन करावे 
-सुनील चोपडा ः मंगल कार्यालय आणि लॉन्स आम्ही विनामूल्य व संघटनेतर्फे ३१ हजारांची देणगी देऊ 
-किरण सोनार ः कविसंमेलनात दोन तास तरुण कवींसाठी उपलब्ध व्हावेत 
-प्रमोद पुराणिक ः कथालेखिका सानिया यांना निमंत्रित करावे. इतर राज्यातील मराठी मंडळांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करावे 
-डॉ. गिरीश पिंपळे ः विज्ञान लेखकांना आमंत्रित करावे. प्रदर्शनस्थळी विज्ञान साहित्याचा स्वतंत्र विभाग असावा 
-स्वानंद बेदरकर ः वाङ्‌मयातील संपूर्ण प्रवाहाला कवेत घेणारे साहित्य संमेलन व्हावे. वाचन संस्कृतीसाठी काय करता येईल? नवीन पिढीसाठी काय करू शकतो? संमेलनातून नाशिकची काय फलश्रुती? याचा विचार व्हावा 
-गीतकार संजय गिते ः समता, चळवळींच्या गीतांचा उपक्रम राबवला जावा. त्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे 
-चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे ः सांस्कृतिक परिसंवादाला राजू पाटील यांचे नाव दिले जावे. त्याची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत. 
-चेतन पणेर ः ज्येष्ठांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे समाजजीवन साहित्य संमेलनातून उमटावे. (श्री. भुजबळांनी ज्येष्ठ नागरिकाला स्वागताध्यक्ष केल्याचे सांगून ज्येष्ठांचा नामोल्लेख केला.) 
-सुरेश पाटील ः संमेलनासाठी ५१ हजार रुपयांची देणगी देत आहे 

वाङ्‌मय पुरस्कारातून साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. एक लाखापर्यंत पुरस्कार रक्कम देताना सन्मानार्थींची संख्या ७४ वरून ३४ करण्यात आली. वाङ्‌मयाच्या प्रथम प्रकाशनाच्या व्याख्येत बदल करण्यात आला. मात्र, सन्मान शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी सन्मानार्थींची संख्या वाढवावी. त्याबाबत ठराव संमेलनात करावा. 
-चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ साहित्यिक