प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने ॲक्टिव्ह मोडमध्ये राहावे – पोलीस आयुक्त पांडे 

नाशिक : संघटित गुन्हेगारी शहरातून हद्दपार करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने कंबर कसली आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ॲक्टिव्ह मोडमध्ये राहण्याच्या सूचना केल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यानी सांगितले. आठवडाभरात विविध पोलिस ठाण्यांमार्फत केलेल्या कामगिरीची दखल घेत गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव भद्रकाली पोलिस ठाण्यात झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

पोलिसांचे मनोबल वाढवून प्रोत्साहन

पोलिसांचे मनोबल वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी गौरव सोहळा घेण्याचे निश्‍चित केले. आठवडाभराच्या कामगिरीचा विचार करून आठवड्यातून एकदा त्यांचा गौरव होईल. त्याची सुरवात शुक्रवारी (ता.१८) भद्रकाली पोलिस ठाण्यातून झाली. भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाचा प्रकार ठोस पुरावा नसताना दोन दिवसांत उघडकीस आणला. त्यानिमित्ताने भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांच्यासह गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंद पवार, त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रक आणि गुलाबाचे फूल देऊन गौरव केला.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

पोलीसांच्या कामगीरीचे पांडेंकडून विशेष कौतुक

वाहनचालकांची लूट करणाऱ्या टोळीस जेरबंद केल्याने आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख व त्यांचे कर्मचारी, पंचवटी पोलिस ठाण्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यास मुंबई येथून अटक करणे, कोम्बिंगदरम्यान गावठी कट्टा आणि नऊ काडतूस जप्त केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत व त्यांचे गुन्हे पथकाचे कर्मचारी, गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली बोलेरो पिक-अपचा काही दिवसांत तपास लावून संशयितांसह ताब्यात घेतल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल त्यांचे गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत युवती खून प्रकरणाच्या तपासात होमगार्ड शेख यांची विशेष कामगिरी होती. ज्या फाइलमुळे गुन्हा उघडकीस आला. ती फाइल त्यांनीच शोधून काढली होती. त्याचबरोबर युवतीच्या घर परिसराची माहिती मिळविण्याचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या या कामगीरीचे पांडे यानी विशेष कौतुक करत त्यांनाही प्रशस्तिपत्रक दिले.