प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य तत्त्वावर अकरावीच्‍या रिक्‍त जागांवर प्रवेश; उद्यापासून प्रवेशप्रक्रिया  

नाशिक: शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्‍या रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे. त्‍यानुसार या जागांवर विद्यार्थ्यांना मिळालेल्‍या गुणांच्‍या आधारे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रक्रिया बुधवार (ता.१३)पासून सुरू होत असून, सात टप्प्‍यांच्‍या या प्रक्रियेतील अंतिम टप्प्‍यात ‘एटीकेटी’च्‍या विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशाची संधी मिळणार आहे. 

‘एटीकेटी’च्‍या विद्यार्थ्यांना संधी, उद्यापासून प्रवेशप्रक्रिया ​

अकरावी प्रवेशासाठी रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य’ या तत्त्वानुसार प्रवेश दिले जातील. आत्तापर्यंत कुठल्‍याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येईल. तसेच यापूर्वी प्रवेश रद्द केलेल्‍या विद्यार्थ्यांनाही प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्‍या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व एटीकेटी सूत्रानुसार पात्र विद्यार्थ्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होताना अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. सात टप्प्‍यांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार असून, गुणवारीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक 
नव्वद ते शंभर टक्‍के गुण‍ (४५० ते ५०० गुण) असलेल्‍या विद्यार्थ्यांना बुधवार (ता.१३) पासून ते शुक्रवार (ता.१५) दरम्‍यान ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायाद्वारे आवडीच्‍या महाविद्यालयासंदर्भात प्रवेशाची प्रक्रिया राबविता येईल. दुसऱ्या टप्प्‍यात शनिवार (ता.१६) ते सोमवार (ता.१८) या मुदतीत ८० ते १०० टक्‍के गुण (४०० ते ५०० गुण) असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तिसऱ्या टप्प्‍यात १९ व २० जानेवारीला ७० टक्‍के गुण (साडेतीनशे गुणांपेक्षा अधिक) मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळेल. चौथ्या टप्प्‍यात २१ व २२ जानेवारीला साठ टक्‍के गुण (तीनशे गुणांपेक्षा अधिक) असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविता येईल. २३ ते २५ जानेवारीदरम्‍यान पन्नास टक्क्‍यांहून अधिक गुण (अडीचशे गुणांहून अधिक) असलेल्‍या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. २७ व २८ जानेवारीदरम्‍यान दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना रिक्‍त जागांवर प्रवेशासाठी अर्ज करत प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. यानंतरही रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर अंतिम टप्प्‍यात २९ व ३० जानेवारीदरम्‍यान एटीकेटी सूत्रास पात्र असलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा