प्रथम वर्ष एमबीबीएसच्‍या उन्‍हाळी परीक्षेत १६८ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण; सुधारित निकाल जाहीर

नाशिक : प्रथम वर्ष एमबीबीएस २०१९ बॅचच्‍या उन्‍हाळी २०२० परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा आधार दिला होता. त्‍यानुसार सुधारित निकाल जाहीर झाला आहे. यापूर्वी नियमित परीक्षेत चार हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ग्रेस गुणांच्‍या आधारे १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एक हजार ६३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्‍यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. 

एक हजार ६३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण 

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष एमबीबीएस २०१९ बॅचचा उन्‍हाळी परीक्षा २०२० चा निकाल गेल्‍या ५ मार्चला जाहीर करण्यात आला होता. राज्‍यभरातून सहा हजार ३९८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यांपैकी चार हजार ५९६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले, तर एक हजार ८०२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. परीक्षेचा निकाल ७१.८३ टक्‍के लागला होता. दरम्‍यान, ग्रेस मार्क्ससह निकाल जाहीर करण्याचा निर्णय ३० मार्चला झालेल्‍या परीक्षा मंडळाच्‍या सभेत घेण्यात आला होता. त्‍यानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण असलेल्‍या आणि ग्रेस मार्क्ससह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यापूर्वीच्‍या निकालानुसार अनुत्तीर्ण ठरलेल्‍या एक हजार ८०२ विद्यार्थ्यांपैकी १६८ विद्यार्थी ग्रेस गुणांमुळे उत्तीर्ण झाले आहेत, तर उर्वरित एक हजार ६३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांचे प्रमाण ९.३२ टक्के आहे.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा