Site icon

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत धान्य वाटप प्रक्रिया सुरू असताना नाशिकरोड येथील गोदाम धान्य उचलीकरिता बंद करण्याची सूचना भारतीय खाद्य निगम, भारतीय अन्न महामंडळ क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र यांच्यामार्फत देण्यात आली होती, याची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत नाशिकरोड येथील गोदामास धान्य उचलीकरिता मुदतवाढ देण्याबाबत मागणी केली असता ती मंजूर केली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेस अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या योजनेस मुदतवाढ मिळाली होती. परंतु, नाशिक जिल्ह्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी लागणारे धान्य भारतीय खाद्य निगममार्फत मनमाड व नाशिकरोड येथील धन्य गोदामामार्फत पुरविले जाते. सद्यस्थितीत नियमित धान्य योजनेसोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्याचे वाटपसुद्धा सुरू आहे. जवळपास दुप्पट धान्य दरमहा उचल केली जात आहे. या उचलीमध्ये मनमाड येथून 55 टक्के व नाशिकरोड येथून 44 टक्के धान्याची उचल केली जाते. दरम्यानच्या कालावधीत भारतीय खाद्य निगमने नाशिकरोड गोदाम बंद करून सर्व धान्य मनमाड येथून उचल करण्याबाबत कळविले होते. डॉ. भारती पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालून केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री यांच्याशी संपर्क साधून नाशिकरोड येथील धान्य गोदाम चालू ठेवण्यास तत्काळ मंजुरी मिळवून दिली असल्याने जिल्ह्यातील धान्य उचलीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

20 हजार टन धान्य…
जिल्ह्यात 15 तालुके व 2 धाविअ कार्यक्षेत्र असे एकूण 17 कार्यक्षेत्रांचे कामकाज करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे 18 हजार 500 मे. टन व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महिन्याला 20 हजार 300 मे. टन धान्याची उचल केली जाते. नाशिक तालुका, सिन्नर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर या 8 गोदामांकरिता धान्याची उचल करण्यात येते. उर्वरित मालेगाव ग्रामीण, धाविअ मालेगाव, नांदगाव, मनमाड गोदाम, येवला, देवळा, बागलाण, कळवण, निफाड व चांदवड या गोदामांकरिता एफसीआय मनमाड येथून धान्याची वाहतूक करण्यात येत आहे.

The post प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना: धान्य गोदाम चालू ठेवण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Exit mobile version