प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची हेळसांड; वाढत्या फेऱ्यांमुळे दिव्यांग आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उघडलेले केंद्र आठ महिन्यांपासून बंद असल्याने दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. जिल्हा रुग्णालयातून महापालिकेकडे प्रमाणपत्रासाठी पाठविले जात असून, वाढत्या फेऱ्यांमुळे दिव्यांग आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची हेळसांड 
केंद्र व राज्य शासनामार्फत दिव्यांगांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी दिव्यांगांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. दिव्यांगांचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात मिळते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे सर्वाधिकार महापालिकेला बहाल केले आहेत.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

कोरोनामुळे केंद्र बंद केल्याचा परिणाम; आंदोलनाचा पवित्रा 

महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा असल्याने रांगांपासून दिव्यांगांची मुक्तता झाली होती. महापालिकेने प्रमाणपत्र देण्यासाठी कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात केंद्राची स्थापना केली होती; परंतु कोविडमुळे महापालिकेने डॉ. हुसेन रुग्णालय कोविड सेंटर म्हणून जाहीर केले. लॉकडाउन असल्याने केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र बंद असल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळत नाही. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

आता दुसऱ्या लाटेचे कारण 
प्रमाणपत्र मिळत नसल्याने जिल्हा रुग्णालयात दिव्यांग दाद मागत आहेत. शासकीय अधिकारांचा कागद पुढे करत महापालिकेकडेच प्रमाणपत्र मिळणार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. तेथील केंद्र बंद असल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे केंद्र सुरू करण्याची गरज असताना आता कोविडची दुसरी लाट येत असल्याचे कारण देत प्रमाणपत्रवाटपाचे केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दिव्यांगांची हेळसांड थांबविण्याची मागणी होत आहे.