
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य मिरविणारी लालपरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. एसटीच्या बसेस राज्यभरात प्रवासादरम्यान प्रवाशांना चहापाण्यासाठी बस थांब्यावर थांबतात. सन २०१६ मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी प्रवाशांसाठी ३० रुपयांत चहा-नाश्ता योजना सुरू केली होती. मात्र, आता या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एसटी प्रवाशांना बसथांब्यांवरील माफक दरात चहा-नाश्त्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे राज्यात ही योजना फसल्याचे चित्र आहे.
खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कात टाकत विविध योजना तसेच उपक्रम सुरू केले. त्यात 30 रुपयांत चहा-नाश्ता योजनेचा समावेश आहे. त्यासाठी महामंडळाने राज्यात 50 अधिकृत थांबे निश्चित केले होते. तेथील हॉटेलांत तिकीट दाखवल्यानंतर एसटी प्रवाशांना प्रसाधनगृहाची सुविधा आणि अल्प दरात चहा-नाश्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एसटीच्या परिपत्रकात नाश्त्याची वेळ आणि प्रमाण याचा उल्लेख नसल्याने बहुतांश अधिकृत थांब्यांवरील हॉटेलांत अल्प दरात चहा-नाश्त्याची सुविधा मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, एसटी महामंडळाने माेठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ३० रुपयांत चहा-नाश्ता योजनेचा लाभ प्रवाशांना होत नाही. या थांब्यांवर संबंधित हॉटेलमालकाकडून आर्थिक लूट सुरू आहे. एसटी बस थांब्यावर जेवण, चहा, नाश्ता यासाठी प्रवाशांकडून हॉटेलचालक मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर आहे.
नाशिक विभागात दोनच अधिकृत थांबे
एसटी महामंडळाने काही अटींची पूर्तता करून राज्यभरात ५० अधिकृत बस थांब्यांना परवाना दिला आहे. त्या बसथांब्यांवर प्रवाशांना अल्प दरात चहा-नाश्ता मिळतो. त्यात नाशिक विभागातील अवघ्या दोन अधिकृत थांब्यांचा समावेश असून, हे थांबे धुळे मार्गावर आहेत. त्यामुळे ३० रुपयांत चहा-नाश्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एसटी महामंडळाने अधिकृत थांब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यात सन २०१६ पासून ३० रुपयांत चहा-नाश्ता योजना सुरू आहे. त्यासाठी ५० अधिकृत थांबे असून, त्यात नाशिकच्या धुळे मार्गावरील दोन थांब्यांचा समावेश आहे. प्रवाशांकडून मागणी झाल्यास या ठिकाणी माफक दरात चहा-नाश्ता मिळू शकतो.
– अरुण सिया, विभागीय नियंत्रक (नाशिक)
हेही वाचा :
- नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे
- बिद्री साखर कारखाना आखाड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकणार शड्डू!
- नाशिक : गौतमी पाटील कार्यक्रमातील वाद, पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांसह आयोजकांविरोधात गुन्हे
The post प्रवाशांना मिळेना माफक दरात "चहा-नाश्ता', एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा appeared first on पुढारी.