प्रशासनाला पडला विसर : सुधीर तांबे आजही आमदारच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अठराव्या लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला असून, नव्या मंत्र्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. नव्या संसदेची इनिंग सुरू झाली असताना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आजही डॉ. भारती पवार, हेमंत गाेडसे व डॉ. सुभाष भामरे यांची नावे खासदार म्हणून झळकत आहेत. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांचेही नाव कायम आहे.

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे, डॉ. सुभाष भामरे, डॉ. सुधीर तांबे यांचा नामोल्लेख.

लोकसभेचा निकाल घोषित होऊन आठवड्याभराचा कालावधी लोटला आहे. जिल्हावासीयांनी यंदा परिवर्तनाच्या बाजूने उभे राहत नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना भरघोस मतांनी विजयी करत संसदेत पाठविले. धुळे-मालेगावमधून डॉ. शोभा बच्छाव यांनी विजय संपादन केला आहे. हे तिन्ही उमेदवार पहिल्यांदाच संसदेची पायरी चढणार आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी ईव्हीएममधून कौल देत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. परंतु, ज्या प्रशासनावर जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला स्वत:च्या कर्तव्याचा कुठेतरी विसर पडल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर राधाकृष्ण गमे, बी. जी. शेखर पाटील, अंकुश शिंदे, शहाजी उमाप यांची झळकणारी नावे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आजही जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. पवार, गोडसे व डॉ. भामरे यांचाच नामोल्लेख आहे. तर चालू वर्षी जानेवारीच्या प्रारंभीच नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी विजयाला गवसणी घालत विधान परिषदेत प्रथमच पाऊल ठेवले. मात्र, सत्यजित तांबे हे आमदार असल्याचा विसरच जणू काही प्रशासनाला पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या यादीत आजही चौथ्या क्रमांकावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा नामोल्लेख कायम आहे. जिल्ह्याची अन‌् निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या प्रशासनाकडूनच अशा चुका होत असल्याने जनतेमध्ये त्याचे हसू होत आहे.

अधिकाऱ्यांची नावे कायम

जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर लोकप्रतिनिधींच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नामोल्लेखाचा गोंधळ कायम आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील हे सेवानिवृत्त होऊन ११ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असताना संकेतस्थळावर आजही त्यांची नावे कायम आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे, तर पोलिस अधीक्षकपदी शहाजी उमाप यांची नावे आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांची गेल्या डिसेंबरमध्येच शासनाने बदली केली हे विशेष.

हेही वाचा: