प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच पेटला वाद; अट वगळण्यासाठी मक्तेदाराकडून दबावतंत्र

नाशिक : आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या महिलांना महिला व बालकल्याण समितीमार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परंतु यापूर्वी झालेल्या प्रशिक्षणातील अनियमितता टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीसह प्रशिक्षण केंद्रात सीसीटीव्ही बसविण्याची महत्त्वपूर्ण अट टाकली जाणार आहे; परंतु ही जाचक अट वगळण्यासाठी मक्तेदाराकडून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला आहे. 

बायोमेट्रिक हजेरीसह सीसीटीव्हीची महत्त्वपूर्ण अट 

महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांसाठी दर वर्षी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. या वर्षी सुमारे सात कोटी रुपये खर्च करून महिलांना संगणक, वाहनचालक, मोबाईल दुरुस्ती, ब्यूटिपार्लर, शिलाई आदी २२ अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व तुकाराम मुंढे यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांना फाटा दिला होता. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार होण्याऐवजी ठेकेदाराचाच अधिक फायदा होत असल्याची भावना त्यामागे होती; परंतु गेल्या वर्षी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या कार्यक्रमाला चालना मिळाली आहे. 

तपासण्यासाठी भरारी पथकाचीदेखील नियुक्ती

प्रशासनातर्फे या कार्यक्रमात अनियमितता होऊ नये म्हणून अटी व शर्ती टाकण्याचे प्रयत्न आहेत. त्यात ज्या सुमारे चार हजार महिला प्रशिक्षण घेणार आहेत. त्यांना खरोखर प्रशिक्षण मिळते की नाही, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही हे तपासण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण योग्य रीतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी भरारी पथकाचीदेखील नियुक्ती केली जाणार आहे. ही अट स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणाऱ्या मक्तेदार कंपनीला अडचणीची ठरणार असल्याने बायोमेट्रिक हजेरीची अटच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

स्वयंरोजगार प्रशिक्षण योग्य रीतीने होत आहे की नाही, महिला उपस्थित राहतात की नाही, हे तपासण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली जाणार आहे. - अर्चना तांबे, उपायुक्त, महापालिका 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल