देवळा (नाशिक) : देवळा तालुक्यात दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केवळ ५६ जागांसाठी मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वच ठिकाणी दुरंगी लढती झाल्या. त्यात प्रस्थापितांना नाकारत इतरांना संधी मिळाल्याचे चित्र आहे. पक्षीय पातळीवर विचार केला असता काही प्रमुख मोठ्या गावांत भाजप, तसेच काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून, इतर लहान गावांत स्थानिक आघाड्या निवडून आल्याने पक्षीयदृष्ट्या संमिश्रता आहे.
सत्तेचा काटा भाजपकडे
देवळा तालुक्यात ११ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लागला होता. त्यात महात्मा फुलेनगर बिनविरोध झाल्याने, तर उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द झाल्याने नऊच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. देवपूरपाडे ग्रामपंचायतीचे विभाजन होत स्वतंत्र झाल्याने येथे पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने चुरस पाहायला मिळाली. येथील पंचायत समितीचे माजी सभापती सुखदेव आहिरे व माजी सरपंच अभिमन आहिरे यांच्या गटाला तीनच जागा मिळाल्या. माजी सरपंच शिवाजी आहिरे यांनी आपल्या पॅनलला बहुमत मिळवून देत सत्तेचा पहिला मान पटकावला. महालपाटणे येथेही देवळा बाजार समितीचे माजी उपसभापती दादाजी आहिरे यांच्या पॅनलने ११ पैकी सहा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या दोन्ही गावांतील पॅनलप्रमुख भाजपचे असल्याने येथील सत्तेचा काटा भाजपकडे असल्याचे दिसते.
कोणत्या पक्षाची सत्ता हे निश्चित सांगणे अवघड
खालप येथे मतदानापूर्वी येथील भाजप व राष्ट्रवादी गटाने चार-चार जागा बिनविरोध करून घेतल्या. नंतर मतदानाद्वारे निवडून आलेल्या तीन उमेदवारांपैकी किती उमेदवार कोणत्या गटाकडे जातील त्यावर तेथील सत्तेचे गणित जुळणार आहे. तिसगाव येथे दोन्ही पॅनलप्रमुखांना नाकारत मतदारांनी युवा क्रांतीच्या कार्यकर्त्यांकडे सत्ता सोपविली आहे. येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख देवानंद वाघ यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले. लोहोणेर येथे प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा यांच्या पॅनलची सरशी झाली आहे. पक्षीयदृष्ट्या निवडणूक लढविली जात नसल्याने येथे कोणत्या पक्षाची सत्ता हे निश्चित सांगणे अवघड आहे. विशेष म्हणजे येथील वॉर्ड क्रमांक सहामधून रेश्मा आहिरे सलग पाचव्यांदा निवडून आल्या आहेत.
हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना
रस्सीखेच असलेल्या गावांत पक्षविरहित राजकारण
तालुक्याच्या पूर्व भागातील गिरणारे, कुंभार्डे, सांगवी, तिसगाव, वऱ्हाळे येथील निवडणुका प्रामुख्याने उमराणे बाजार समिती डोळ्यासमोर ठेवून लढल्या जातात. त्यामुळे या गावांतही रस्सीखेच असली तरी ती पक्षविरहित असल्याचे दिसून आले. या सर्व दहा ग्रामपंचायती (महात्मा फुलेनगर धरून) अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने येथील गावांतील सरपंचपदासाठी चुरस असणार आहे. देवळा तालुक्यात अशा २० ग्रामपंचायती असून, त्यात अनुसूचित जाती- १, अनुसूचित जमाती- २, नागरिकांचा मागास प्रवर्ग- ५, सर्वसाधारण- १२ असे आरक्षण निघाले आहे.
हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा