प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींची करायचा फसवणूक; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

इंदिरानगर (नासिक) : सोशल मीडियाच्या माध्यमातून युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या संशयित वैभव लक्ष्मण पाटील (रा. उगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) या भामट्याला इंदिरानगर पोलिसांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अटक केली.

याबाबत वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२० मध्ये शहरातील २० वर्षीय तरुणी हरविल्याची तक्रार पालकांनी नोंदविली होती. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण बाकले या प्रकरणाचा तपास करत असताना पाटील याच्या बद्दलची धक्कादायक  माहिती समोर आली आहे.

याच प्रकारच्या अनेक गुन्हे दाखल

सोशल मीडियाद्वारे मुलींना प्रभावित करणे, लग्नाचे आमिष दाखवून पलायन करणे, लग्न न करणे पण झाले आहे, असे भासवून तो युवतींचे आर्थिक व शारीरिक शोषण करतो असे समजले. तरुणीचीदेखील त्याने फसवणूक केल्याच्या संशयावरून इंदिरानगर पोलिसांनी मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या भागात सतत दोन महिने तपास सुरू ठेवला. त्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील रबाडा आणि सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात याच प्रकारच्या गुन्ह्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समजले. मात्र, बदनामीच्या भीतीने समोर कुणी येत नव्हते. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

नाशिकच्या तरुणीची तावडीतून सुटका 

मंगळवारी (ता. १६) मुरबाड येथील पोलिसांच्या बातमीदाराने दिलेल्या गुप्त माहितीनुसार तो तेथे असल्याची माहिती मिळाली. तातडीने उपनिरीक्षक बाकले आणि हवालदार गवारे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना सोबत घेऊन वैभव पाटील याच्या तेथे मुसक्या आवळल्या आणि मुलीची सुटका केली.

गुन्हा दाखल

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता. १७) त्याला न्यायालयात हजर केले असता २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुहासिनी बारेला, मुख्यालयातील उपनिरीक्षक देसले, जावेदखान, आहेर, खांडेकर या टीमने ही कामगिरी बजावली. कामगिरीबद्दल वरिष्ठ निरीक्षक माईनकर आणि टीमचे पोलिस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त विलास खरात आणि सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी अभिनंदन केले. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार