Site icon

प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आपल्या ४० आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन जाणार आहेत. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. ‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे ४० खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ अशी टीका एकनाथ खडसे यांनी कवितेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

३ महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या…

तुम्हाला गुवाहाटीला जायचं असेल तर नक्की जा, विमानाने जा. पण गोरगरिबांना २ रुपये किलोनं धान्य तर द्या.. तुम्हाला काय करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी थांबवा. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्वात जास्त आत्महत्या तीन महिन्यात झाल्या आहेत. या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा कसली सुव्यवस्था सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे, अशी टीकादेखील एकनाथ खडसे यांनी केली आहे.

माझ्या मुलीला तिकीट देऊन पाडलं…

यावेळी त्यांनी भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. माझ्या मुलीला तिकीट दिलं आणि व्यवस्था काय केली तर पाडण्याची, हे मी सांगत नाही तर विद्यमान मुख्यमंत्री मुक्ताईनगरमध्ये येऊन स्वतः सांगत आहेत. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले. पाटील यांना निवडून आणण्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा गिरीश महाजनांचा आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनीच गद्दारी केली अशी पावतीच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

The post प्रेयसीप्रमाणे खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची आठवण : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Exit mobile version