‘प्रोजेक्ट गोदा’चे ड्रेनेजलाइन काम मंदावले! वाहनधारकांसह स्थानिकांनाही मोठा फटका

म्हसरूळ (नाशिक) : गोदाघाटाच्या रस्त्यावर स्मार्टसिटीच्या ‘प्रोजेक्ट गोदा’अंतर्गत सुरू असलेले ड्रेनेजलाइनचे काम अत्यंत संथगतीने केले जात असल्यामुळे या भागात येणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. 

रामकुंड परिसरातील व्यवसाय हे भाविक व पर्यटकांवर अवलंबून आहेत. धार्मिकस्थळे बंद होती, त्या वेळी येथील व्यावसायिक अडचणीत होते. धार्मिकस्थळे खुली करण्यात आल्यानंतर भाविकांसह पर्यटक वाढण्याची स्थिती असताना गंगाघाटावरील काम सुरू असल्याने त्यांना रामकुंडाकडे येण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पर्यटकांची वाहने रामकुंडापासून दूरवरच्या भागातील पार्किंगमध्ये थांबवावी लागतात. त्यामुळे हे ग्राहक रामकुंडाच्या परिसरात थांबत नाहीत. तसेच रस्त्यात होणारी कोंडी लक्षात घेऊन स्थानिक नागरिकही दुसऱ्या मार्गाने ये-जा करू लागल्याने येथील दुकानांत येणारे ग्राहक कमी झाले आहेत. 

वाहनधारकांसह गोदाघाटावरील व्यावसायिकांना फटका 

गोदाघाटाचा रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीचा पर्यायी मार्ग म्हणून सरदार चौकातून मुठेगल्ली, शनिचौक, गोरेराम मंदिरासमोरून रामकुंडाकडे येणाऱ्या मार्गाचा वापर करावा लागत आहे. हा मार्ग अत्यंत अरुंद असून, या मार्गावर मोठी वाहने आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा त्रास येथील स्थानिक नागरिकांना तसेच दुकानदारांना होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. जास्त काळ वाहने चालू स्थितीत राहत असल्यामुळे वायुप्रदूषणात होणारी वाढ ही मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. 

ठेकेदारही हैराण 

अहिल्याराम व्यायामशाळेलगत या कामात खडक फोडताना पाण्याचा झरा लागल्याने या कामाची गती मंदावली आहे. या खड्ड्यातून पंपाने पाणी काढले जाते, मात्र काही वेळातच पुन्हा पाणी खड्ड्यात जमा होते. यामुळे ठेकेदारही हैराण झाला असून, त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

वाडे पडण्याची भीती 

गोदाघाटाचा हा भाग गावठाण क्षेत्रात मोडत असून, या ठिकाणी अनेक जुने वाडे आहेत. यातील काही वास्तू अत्यंत जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत. मात्र रस्ता कामात लागलेला खडक फोडण्यासाठी पोकलेनचा वापर केला जात असल्याने या मशिनच्या हादऱ्याने हे जीर्ण वाडे अजून मोडकळीस येऊन अचानक पडण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार