प्लॅस्टिकच्या क्रेट्सआड सापडलं लाखोंचे घबाड! पुण्यातील तिघांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

पेठ (जि. नाशिक) : गुजरातकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला पोलिसांनी अडवले. या ट्रकमधे शेतीसाठी वापरतात ती प्लॉस्टिकचे क्रेट्स होते. मात्र जेव्हा पोलिसांनी ते बाजूला करुन पाहिले तेव्हा मात्र लाखोंचे घबाड हाती लागले

बंदी असताना चोरटी वाहतूक..

सोमवारी (ता. ५) गुजरातकडून नाशिकच्या दिशेने एक ट्रक भरधाव मार्गक्रमण करीत असताना पेठजवळील वांगणी शिवारात गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने ट्रक (एमएच १२, एसएफ ८०१०) हा अडवून तपासणी केली. यात दुपारी उन्हाच्या तीव्रतेची वेळ साधत महाराष्ट्र राज्यात गुटखा वाहतुकीस परवानगी नसताना शेतीमालासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक क्रेट्सच्या पाठीमागे वेगवेगळ्या नावांचा गुटखा आढळून आला. त्यात १७ लाख ३६ हजार २४० रुपयांचा केशरयुक्त विमल पानमसाला, एक लाख ३७ हजार २८० रुपये किमतीची व्ही-१ सुगंधी तंबाखू मिळून आली. या प्रकरणी पेठ पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितात पुण्यातील तिघांचा समावेश आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

पोलिसांनी केली झटपट कारवाई 

अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी पेठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वाहनचालक अर्जुन नारायणलाल देवासी, जितूराम गमनराम माळी (दोघे रा. राजस्थान), पूनजी शेठ (नानापोंडा, गुजरात,) मुकेशभाई महाराज, चेतनसिंग राज पुरोहित, चेनालाल देवासी (रा. सर्व पुणे) आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत वाहनासह साधारण ३० लाख २९ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप वसावे, हवालदार तुपलोंढे, खांडवी तपास करीत आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन