फडणवीसांचे आश्‍वासन घेऊन पदाधिकारी परतले! पुढील आठवड्यात उडणार विकासकामांचा बार

नाशिक : मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात महापौर, आमदारांसह ज्येष्ठ नेत्यांना सोमवारी (ता. १५) तातडीने बोलाविल्याने शहराध्यक्षांसह सत्तेतील विविध पदांमध्ये बदल होण्याची चर्चा नाशिकमध्ये भाजपच्या काही नेत्यांकडून पसरवली जात असताना, दुपारपर्यंत भाजपमधील वातावरण ढवळून निघाले. मात्र, चर्चा पसरविणाऱ्यांचा भ्रमनिरास तर झाला. मात्र, ज्यांच्याबद्दल चर्चा घडविल्या गेल्या, त्यांची स्थाने अधिक भक्कम झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विकासकामांचे उद्‌घाटन करण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे पुढील आठवड्यात भाजपकडून विकासकामांचा बार उडविण्याचा मार्ग मोकळा झाला. 

गेल्या आठवड्यात आमदार जयकुमार रावल यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचा अहवाल विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. वेळेअभावी रद्द केलेली बैठक सोमवारी झाली. मेट्रो निओ प्रकल्पासाठी पाठपुराव्याने दोन हजार कोटी रुपयांची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केल्याने फडणवीस यांचा नाशिकककरांतर्फे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सत्कार केला. आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, उपमहापौर भिकूबाई बागूल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक भगवान दोंदे, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक यशवंत निकुळे उपस्थित होते. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

विकासकामांचा उडणार बार 

भाजप पदाधिकाऱ्यांना फडणवीस यांच्याकडून २२ फेब्रुवारीला उद्‌घाटन कार्यक्रमास येण्याचे आश्‍वासन देण्यात आले. यशवंत व्यायामशाळेचे उदघाटन, अडीचशे कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे उद्‌घाटन, ९२ हजार एलईडी प्रकल्पाचे लोकार्पण तसेच शहरातील नवीन १७ जलकुंभांचे लोकार्पण होणार आहे. १ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार असल्याने त्यापूर्वी विकासकामांचा बार उडविला जाणार आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार