फडणवीसांना भूमिपूजनाला येऊ देणार नाही – सुधाकर बडगुजर

नाशिक : सिडको व मायको सर्कल येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निविदा निघाल्याने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता स्थगिती देण्याचा अधिकार आयुक्तांना नव्हे, तर राज्य शासनाला आहे. शासन शिवसेनेचे असून, ते जनतेबरोबर आहे. जनहिताच्या कामांना शिवसेनेने कधीच विरोध केला नाही. मात्र, उड्डाणपुलाला स्थगिती देण्याचे पत्र देऊन भाजपने खरा चेहरा लोकांना दाखविल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला.

भाजपचे खरे रूप नाशिककरांसमोर
 
अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंजूर केला. अंदाजपत्रकात तरतूद असल्याने व तीन वर्षांत रक्कम खर्च होणार असल्याने शिवसेनेच्या मागणीवरून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली; परंतु पुलाचे श्रेय घेण्यासाठी महापौरांसह आमदार सीमा हिरे सरसावल्या. आता तेच काम रद्द करण्यासाठी आयुक्तांना आदेशित केल्याने भाजपचे खरे रूप नाशिककरांसमोर आले आहे. कोणत्याही शासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यास स्थगिती देता येत नाही, स्थगितीचा अधिकार फक्त शासनाला आहे. ज्येष्ठ सदस्य असतानाही महापौरांकडून होणारी विधाने हास्यास्पद असल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला. 

फडणवीसांना येऊ देणार नाही

पुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने पूल होणारच, परंतु आता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा अधिकार भाजपला राहिलेला नाही. भूमिपूजनाला महापौर किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर राहिल्यास तो प्रयत्न हाणून पाडला जाईल. शिवसेना जनहिताची कामे करते. त्यामुळे आमचे काम थांबविण्याची हिंमत कुणी करू नये. तसे झाल्यास शिवसेनास्टाइलने उत्तर दिले जाईल, असा इशारा बडगुजर यांनी दिला. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

शिवसेनेच्या विकासकामांमध्ये भाजपने कितीही खोडा घातला तरी शिवसेना जनसेवेचा वसा कायमच ठेवेल. - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण