नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात पक्ष फोडण्याचे, आमदार-खासदार पळवापळवीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ खर्ची पडत आहे. राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांंना वेळ नाही. फडणवीस तुम्ही सुरू केलेला फोडाफोडीचा खेळ उद्धव ठाकरे संपवतील, अशा शब्दांत उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आगपखाड केली. पालकमंत्री दादा भुसे व खा. हेमंत गोडसे यांच्यावर तोफ डागताना नाशिकच्या प्रकल्पांबाबत आपण सदनात किती प्रश्न उपस्थित केले, असा जाबदेखील अंधारे यांनी विचारला.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त अंधारे यांनी सोमवारी (दि. ११) नाशिकमध्ये सभा घेतली. बी. डी. भालेकर मैदानावर झालेल्या या सभेत अंधारेंनी मंत्री भुसे, खासदार गोडसे यांच्यासह भाजपवर तोफ डागली. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार अनिल कदम व योगेश घोलप, माजी महापाैर विनायक पांडे, हर्षा बडगुजर यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या, नाशिकमध्ये 1200 कोटींचा ड्रग्जचा कारखाना सापडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत असताना पालकमंत्री म्हणून तुम्ही काय करत होता, असा सवाल उपस्थित करत, प्रशासनावर पकड निर्माण करण्यात तुम्ही सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी भुसेंवर केली. नऊ महिने ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या ललित पाटीलला कोण रसद कोण पुरवत होते, असा प्रश्नदेखील अंधारे यांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये अडीच वर्षांत रेल्वे चाक दुरुस्ती कारखाना, इलेक्ट्रिक हब, कृषी टर्मिनल, नमामि गोदा, लॉजिस्टिक पार्क यासारख्या प्रकल्पांचे थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले. पण त्याचे पुढे काय झाले? या प्रकल्पांच्या पाठपुरावाची जबाबदारी असलेल्या गोडसे यांनी संसदेमध्ये याबद्दल किती प्रश्न उपस्थित केले, असा जाब अंधारे यांनी विचारला. केंद्र व राज्य हे सरकार केवळ फोटो शूटिंगमध्ये धन्यता मानत असल्याची टीकादेखील अंधारे यांनी केली. यावेळी बडगुजर व करंजकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
लाव रे तो व्हिडिओ
सुषमा अंधारे यांनी सभेदरम्यान केंद्र व राज्यातील सरकारसह पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे यांच्यावर चौफेर टीका केली. सभेमध्ये अंधारे यांनी विविध व्हिडिओ लावत भाजपच्या आश्चासनांची पोलखोल केली. तसेच भाजपने गाजर देणे बंद करावे, असे सांगताना २०२४ ला भूलथापा नको, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. तसेच काँग्रेसचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारणाऱ्या भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा का उभारला नाही? त्यांना भारतरत्न का दिले नाही? असा सवाल करत भाजपचे सावरकरप्रेम बेगडी असल्याची टीकाही अंधारे यांनी केली.
हेही वाचा :
- कस्तुरी : ठसकेबाज लावण्या, कलाकारांशी गप्पा अन् गाणी
- पूरन, होल्डर, मेयर्सने नाकारला केंद्रीय करार
- Nashik Murder : फ्लॅट विक्रीवरुन वाद, डोक्यात वरवंटा टाकून मोठ्या भावाचा खून
The post फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.