Site icon

फळे, भाजीपाल्यातून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन 

 नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

देशात भाजीपाला आणि फळ उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे, भाजीपाला यांची निर्यात करतो. त्यातही भारतीय फळे आणि भाजीपाल्याला परदेशात मोठी मागणी असून, एप्रिल २२ ते नोव्हेंबर २0२२ या आठ महिन्यांत फळे, भाजीपाला निर्यातीतून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. या चलनामुळे शेतीने अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत आहे.

भारत कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मागील वर्षी याच कालावधीत निर्यातीतून ७ हजार ७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे.

जागतिकीकरण व जागतिक व्यापार संघटनेतील कृषिविषयक तरतुदीमुळे कृषिमालासाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली असून, महाराष्ट्र राज्यामध्ये फळे व भाजीपाला पिकांखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. देशातील सुमारे १०३ लाख हेक्टर एवढे क्षेत्र भाजीपाला लागवडीखाली आहे. त्यापैकी सध्या महाराष्ट्रात सुमारे ६.९३ लाख हेक्टर इतके क्षेत्र आहे. देशामध्ये भाजीपाला पिकांचे सुमारे १,७५० लाख मे. टन इतके उत्पादन असून, महाराष्ट्रामध्ये सुमारे १०० लाख टन एवढे उत्पादन घेतले जाते. राज्यात फळांमध्ये द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी आदी फळे मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत, तर भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने कांदा, भेंडी, कारले, वांगी, टोमॅटो, फुलकोबी, पत्ताकोबी, दुधीभोपळा, शेवगा शेंग, तोंडली, हिरवी मिरची, घेवडा, कढीपत्ता, पडवळ, बटाटा इत्यादी प्रमुख पिकांचे उत्पादन होऊन निर्यात होते.

महाराष्ट्र फळे, भाजीपाला निर्यातीत अग्रेसर

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या काळात देशातून भाजीपाला आणि फळे २६ लाख ५९ हजार ३९९ मे. टन फळे आणि भाजीपाला निर्यात झाला असून, ७,८५० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. फळे आणि भाजीपाला निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन आपल्याकडे होत असल्याने यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. याच कारणांमुळे महाराष्ट्र देशात फळे आणि भाजीपाला निर्यातीत अग्रेसर असल्याचे दिसत आहे.

दिवसागणिक शेतमालाची निर्यात वाढत आहे. मात्र अजूनही निर्यातवाढीस बराचसा वाव आहे. यासाठी कोणत्या देशात कोणत्या मालाला मागणी आहे. याबाबतची नेमकी माहिती शेतकऱ्यांना पुरवली पाहिजे. उत्पादन केंद्र आणि बंदरे यांना जोडणाऱ्या हाताळणी व वाहतूक सुविधांचा अभाव दूर केला पाहिजे.

– सचिन आत्माराम होळकर, कृषितज्ज्ञ लासलगाव

हेही वाचा :

The post फळे, भाजीपाल्यातून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन  appeared first on पुढारी.

Exit mobile version