नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचेच नियोजन कोलमडले असताना, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अद्यापही विविध शिक्षणक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेशाच्या बाबतीत औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमच अव्वलस्थानी राहिले. नाशिक विभागात उपलब्ध जागांच्या तुलनेत बी. फार्मसीचे ८९ टक्के, डी. फार्मसीचे ९८ टक्के, एम. फार्मच्या ९७ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यापाठोपाठ एमसीए अभ्यासक्रमाच्या ९३ टक्के जागा भरल्या असून, एमबीए अभ्यासक्रमाच्या ८७ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत.
यंदा फेब्रुवारीपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होती. तर कृषी, वैद्यकीय व अन्य शाखांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच लॉकडाउनच्या काळात फार्मास्युटिकल क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने प्रवेश प्रक्रियेवरही याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळाला. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या मोजक्याच जागा शिल्लक आहेत. पदवी अभ्यासक्रम बी. फार्मसीकरिता विभागातील सहा हजार १९५ जागांपैकी पाच हजार ५२३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम. फार्मसीकरिता एक हजार २२१ जागांपैकी एक हजार १८३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान, यंदा एमबीए या व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या प्रवेशालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा
अभियांत्रिकीकडे यंदाही पाठ
काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या पदवी, पदविका अभ्यासाच्या प्रवेशावर परिणाम जाणवत आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्येही पदवी (बी. ई., बी. टेक.) अभ्यासक्रमासाठी विभागात ४४ टक्के जागाच भरल्या आहेत. यात, विभागांतर्गत नंदुरबारमध्ये नीचांकी १७ टक्के जागांवरच प्रवेश झाले आहेत. पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या ४९ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना
प्रमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जिल्हानिहाय स्थिती (टक्केवारी)
शिक्षणक्रम जिल्हा विभागाचे
नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबार एकूण
बी. फार्मसी ९२ ९० ८६ ९० ७४ ८९
डी. फार्मसी ९९ ९९ ९९ ९९ ९६ ९९
फार्म. डी. ९८ -- -- -- -- ९८
बी. ई., बी. टेक. ४३ ४७ ४२ ५५ १७ ४४
डिप्लोमा इंजिनिअरिंग ५६ ५१ ४० ३८ ३८ ४९
एम. फार्मसी ९७ ९६ ९४ ९८ १०० ९७
एमबीए ८८ ९१ ७४ ९५ -- ८७