फास्टॅगने टोलप्लाझावर गोंधळात भर! पिंपळगावला वाहनचालक-कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार राडा 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : आंदोलन व कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादाने प्रसिद्ध पिंपळगाव टोलप्लाझावरील गोंधळात फास्टॅगच्या अंमलबजावणीनंतर अधिकच भर पडली. फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली. फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट दराने पथकर वसुली झाल्याने वाहनचालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. फास्टॅगच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी टोलप्लाझा वादविवादांनी दणाणून गेला. 

महामार्गावरील सर्वाधिक महागडा टोलप्लाझा

तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर सोमवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून फास्टॅग अंमलबजावणीला पिंपळगाव टोलप्लाझावर प्रारंभ झाला. दिवसभरात सुमारे १० हजार वाहने पिंपळगाव टोलप्लाझा ओलांडून गेली. त्यातील सुमारे ३ हजार वाहनांना फास्टॅग नव्हता. त्यांच्याकडून दुपटीने पथकर वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी आग्रह धरला. अगोदरच मुबंई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक महागडा टोलप्लाझा म्हणून पिंपळगावची ओळख आहे. त्यात फास्टॅग नसल्याने दुप्पट पथकर हा वाहन चालकांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरला. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

दिवसभर गोंधळ सुरू

वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये दुप्पट पथकर वसुलीवरून शाब्दीक चकमकी उडाल्या. काही प्रकरणे तर हातघाईवर जाऊन राडा देखील झाला. वादाचे प्रसंग उद्‌भवणार, हे गृहित धरून पिंपळगाव टोलप्लाझा प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बळ तैनात केले होते. वाद नको म्हणून काही वाहनचालक दुपटीचा पथकर देऊन पुढे जात होते. पण, अनेक जण तो देण्यास तयार नसल्याने धुमचक्री होत होती. पोलिसांच्या मध्यस्थीने हे वाद मिटविले जात होते. दिवसभर असा गोंधळ सुरू होता. त्यातून टोलप्लाझापासून एक किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कर्णकर्कश हॉर्नने टोलप्लाझावर एकच गोंधळ बघायला मिळाला. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

केंद्र शासनाने फास्टॅगची अंमलबजावणी करताना सामान्य नागरिकांची पिळवणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. एका बाजूला महामार्ग साकारला; पण, दुसरीकडे दुप्पटीने कर वसुली म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ आहे. फास्टॅग किंवा रोखीने पथकर हे एच्छिक ठेवायला हवे. 
- केशव वाघचौरे, वाहनचालक 

फास्टॅगची अंमलबजावणी करण्यासाठी शासन पातळीवरून सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार फलक व ध्वनीक्षेपकाद्वारे आम्ही जनजागृती करीत आहे. फास्टॅगची सुविधा न बसविणाऱ्या नागरिकांना याची झळ बसणार आहे. 
- नवनाथ केदार, व्यवस्थापक, टोलप्लाझा, पिंपळगाव बसवंत