फास्टॅग… ‘फास्ट गो’ नव्हे ‘टोलधाड’! विदारक चित्र पुढे

नाशिक : टोलनाक्यांवरील प्रवास गतिमान व्हावा म्हणून फास्टॅग अवलंबाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीची नेमकी स्थिती काय आहे, याचा धांडोळा ‘सकाळ’च्या बातमीदारांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी, पिंपळगाव बसवंत आणि चांदवड टोलनाक्यावर घेतला. त्यातून विदारक चित्र पुढे आलेय.

पिंपळगावमध्ये चालकांना मनस्ताप 
पिंपळगाव बसवंत : महामार्गावरील सर्वांत महागड्या व कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनामुळे नेहमी चर्चेत राहिलेल्या येथील टोल प्लाझावर कासवगतीच्या कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा हा वाहनचालकांच्या डोकेदुखीचा विषय झालाय. फास्टॅगनंतर त्यात काही सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, फारसा बदल झाला नाही. इथून जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक वाहनांना फास्टॅग नाही. ही स्थिती जेव्हा ध्यानात आली, तेव्हा काही वाहनचालकांशी संवाद साधल्यावर फास्टॅग लावूनही आर्थिक भुर्दंड कमी होत नसेल, तर सुविधेचा काय उपयोग, असा प्रश्‍न उपस्थित केला. हे कमी की काय म्हणून टॅग आहे, तर नेटवर्क नाही, असे बऱ्याचदा घडल्याचे दृश्‍य पाहायला मिळाले. मग मात्र नाशिकहून धुळ्याकडे निघालेल्या एका चालकाकडून हे कसले ‘फास्ट गो’ हे अजूनही ‘स्लो गो’ चाललेय अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

टॅग आहे, तर नेटवर्क नाही इथपासून स्थानिकांना जाताना-येताना भुर्दंड 
फास्टॅगमुळे ‘फास्ट गो’ होण्याऐवजी टोलधाड चालल्याची अनुभूती वाहनचालकांना आलीय, तसेच वाहनांसाठी टॅग लावलाय, तर नेटवर्क नाही इथपासून स्थानिकांना जाताना-येतानाचा भुर्दंड सहन करावा लागण्यापर्यंतच्या समस्या दोन दिवसांच्या ‘स्पॉट रिपोर्टिंग’मध्ये आढळल्या. त्याविषयी... टोलनाका ओलांडून पुढे जाण्यासाठी अर्ध्या तासाची करावी लागणारी प्रतीक्षा १ डिसेंबर २०२० पासून सुरू झालेल्या आणि पुढे सतत मुदतवाढ मिळालेल्या फास्टॅग योजनेमुळे संपुष्टात येईल ही स्थानिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. इथल्या टोलनाक्यावरून दिवसाला २५ हजार वाहने ये-जा करतात. त्यासाठी पंधरा लेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ११ लेन फास्टॅगसाठी, तर चार लेन रोखीने पथकर वसुलीसाठीच्या आहेत.

\हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

गोंधळात भर पडत असल्याचे चित्र

नियोजनशून्य कारभाराचा कळस म्हणजे, तीन लेन शोभेच्या वस्तू बनल्या. रोख पथकर देणाऱ्यांसोबत फास्टॅगच्या लेन ‘हाउसफुल’ असतात. नेटवर्क न मिळाल्यास चालक आणि टोलप्लाझावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादंगाचे प्रसंग पाहायला मिळतात. त्यावर आणखी कळस होतो तो म्हणजे, स्थानिक वाहनांना सवलत असताना ते फास्टॅग लेनमधून गेले, की त्यांचाही खिसा कापला जातो. फास्टॅग नसलेली वाहने कॅशलेसच्या रांगेत येताच, गोंधळात भर पडते. कोणत्या वाहनाने कोठे जावे हे अनेकदा चालकांना समजत नसल्याने अथवा तशी व्यवस्था करण्याची तसदी व्यवस्थापनाने घेतलेली नसल्याने गोंधळात भर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाद, आंदोलनाची पार्श्‍वभूमी लाभलेल्या टोलप्लाझावरील ठेकेदार कंपन्या बदलल्या असल्या, तरीही फास्टॅगने चालकांची सुटका झालेली नाही. 

फास्टॅग म्हणजे काय रं भाऊ? 
चांदवड : येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात बहुतांश जण फास्टॅग नसल्याचे आढळल्यावर एका वाहनचालकाकडे चौकशी केली की, फास्टॅग का लावला नाही. हे चालक संवादावेळी पारेगाव (ता. चांदवड) येथील होते. त्यांनी थेट फास्टॅग म्हणजे काय रं भाऊ, असा प्रश्‍न केला. ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गतच्या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना लागू झाली आहे. मात्र, अनेक वाहनधारकांना त्याची माहिती नसल्याने टोलनाक्यावर पोचल्यावर मनस्ताप होत असल्याचे दिसून आले. 

व्यवस्थापनाचे म्हणणे
महामार्गावरील मंगरूळ टोलनाक्यावर दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकच लेन रोख पथकरासाठी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागताहेत. टोलनाक्यावरील व्यवस्थापनाकडून वाहनचालकांना कागदपत्रे उपलब्ध असल्यास पाच मिनिटांत फास्टॅग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान, चांदवड शहर, मंगरूळ गटग्रामपंचायतींतर्गतच्या वाहनांना टोलनाक्यावर सवलत आहे. मात्र, त्यासाठी वाहनांना फास्टॅग बसविले जावे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

टोलनाका व्यवस्थापनाला जावे लागते वादाला सामोरे 
घोटी : स्थानिक वाहनांसाठी वेगळी लेन ठेवण्यात आली आहे. मात्र राजकीय, सामाजिक दबाव वाढवून टोल न भरण्याचा चंग बांधलेल्यांशी वाद घालण्यास टोलनाका व्यवस्थापनाला सामोरे जावे लागत आहे. विनाफास्टॅग लेनमध्ये वाहने शिरतात, टोलविषयी विचारले, की स्थानिक असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यातून वादाला तोंड फुटते अन्‌ वाहनांची तुंबळ गर्दी होते. फास्टॅग लेनमधून बाहेर पडण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात असल्याने वादंगाचे प्रसंग रोजचे झाले. त्यातून इतर वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. इथल्या टोलनाक्यावर शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी होते. त्यादृष्टाने व्यवस्थापनाने बदल केले असले, तरीही वाहनचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत राहत नाहीत. महामार्गासाठी संपादित झालेल्या व उर्वरित जागेत छोटे-मोठे व्यवसाय सुरू केलेल्या तरुणांना वाहतूक कोंडीमुळे समस्यांना सामोरे जावे लागणे हे नित्याचे बनले आहे. 

बोंबाबोंबची ठळक उदाहरणे 
० टोलनाक्यावरील नोंदणीकृत वाहनधारकांना पिंपळगावला दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी ६० रुपये शुल्क द्यावे लागते. हे शुल्क अदा केल्यावर वाहन परतत असताना फास्टॅगच्या माध्यमातून १३५ रुपयांची कपात होते. इथून एका बाजूच्या प्रवासासाठी ४० रुपये आकारले जातात. बरं हे माहिती असणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. ज्याला माहिती आहे, असे मोजके वाहनचालक अतिरिक्त कपात झालेले पैसे परत मिळविण्यासाठी ऑनलाइन झगडा सुरू करतात. इतरांच्या बाबतीत ही ‘टोलधाड’ असते. 
० फास्टॅग लावलेला नसल्यास फास्टॅगच्या लेनमध्ये वाहन शिरल्याने दुप्पट पथकर वसुलीचा भुर्दंड अनेकांना सहन करावा लागतो. दुप्पट पथकर सांगितल्यावर वादाला तोंड फुटते आणि मग इतर वाहनांचा खोळंबा होतो. 
० चांदवडला टोल भरल्यावर अवधान (धुळे) येथे टोलकपात होण्याचे कारण नाही. मात्र, धुळ्यातही फास्टॅगच्या पैशांची कपात होते, अशी बोंब अनेक वाहनचालकांकडून परतीच्या प्रवासात ऐकायला मिळाली.