फी भरा..नाहीतर ऑनलाइन शिक्षण बंद; स्कूल असोसिएशनचा निर्णय

नाशिक : कोविडमुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे; परंतु पालकांच्या फीवर चालणाऱ्या शाळांना आता ऑनलाइन शिक्षण परवडत नाही, शिक्षकांकडूनदेखील पूर्ण वेतनाची मागणी केली जात आहे व शाळेचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने ज्या पालकांनी नियमित फी अदा केली असेल त्यांच्याच पालकांचे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असून, सात दिवसांच्या आत पालकांनी फी भरावी अन्यथा ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय स्कूल असोसिएशनने घेतला आहे. 

फी न भरल्यास ऑनलाइन शिक्षण बंद 

शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना स्कूल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. फ्रावशी अकादमीचे रतन लथ, हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोविडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शाळांनी पालकांकडे फीसाठी तगादा लावला नाही. पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती केली नाही, अडचण असलेल्या पालकांना शाळांनी मदत केली. काही शाळांनी फीमध्ये सवलत दिली. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दर्जेदार शिक्षण दिले. पालकांच्या फीवर चालणाऱ्या शाळांना आता आर्थिकदृष्ट्या शाळा चालविणे परवडत नाही.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

स्कूल असोसिएशनचा निर्णय; सात दिवसांची मुदत 

शाळेच्या कर्जाचे हप्ते, स्कूल बसचे हप्ते, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन, शाळेचे भाडे यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ऑनलाइन शिक्षणाचा खर्च नियमित शिक्षणापेक्षा अधिक आहे. शिक्षकांच्या वेतनामध्ये ५० टक्के कपात करण्यात आली आहे; परंतु आता शिक्षक वेतनाची उचल मागत आहेत. ५० टक्के वेतनकपात असली तरी भविष्यात कपात करण्यात आलेल्या वेतनाची भरपाई द्यावी लागणार आहे. आता शिक्षक पूर्ण वेतनाची मागणी करत असून, तरच कामावर येण्याची तयारी दाखविली जात आहे. त्यामुळे जे पालक फी भरणार नाहीत त्यांचे ऑनलाइन शिक्षण तात्पुरते बंद ठेवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

पालक मुद्दाम फी भरत नाहीत 
स्कूल असोसिएशनने पालकांबाबत एक निरीक्षण नोंदविले असून, त्यात आर्थिक परिस्थिती चांगली असूनही पालक मुद्दामहून फी भरत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सधन घरातील पालकांकडून सर्व प्रकारचे खर्च सुरू आहेत; परंतु फक्त शाळेची फी भरण्याची मानसिकता नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.