फुटीचा शिक्का मारत नगरसेवकांची भाजपमध्ये कोंडी; गिते, बागूलसमर्थक असल्याच्या तक्रारी 

नाशिक : माजी आमदार वसंत गिते व ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यनंतरही त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांनी भारतीय जनता पक्ष न सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांना पक्षातून काढण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक व आमदारांचा गट सक्रिय झाला असून, गिते, बागूलसमर्थक असल्याने ते फुटणारच, असा शिक्का त्यांच्या माथी मारून कोंडी केली जात असल्याच्या तक्रारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे नाराज नगरसेवकांनी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधूनच पक्ष फोडला जात आहे. 

भाजपच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

पुढील वर्षी महापालिकाची निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी माजी आमदार गिते व सुनील बागूल यांनी गेल्या महिन्यात भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमध्ये असताना गिते व बागूल यांना मानणारे कार्यकर्ते व नगरसेवकांचा मोठा गट होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही नगरसेवकांनी त्यांच्या मागे न जाता भाजपशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे आंदोलन, कार्यक्रमात सक्रिय राहिले. गिते व बागूल यांच्या मागे न जाता भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निश्‍चय नगरसेवकांनी केला. मात्र, पक्षनिष्ठेच्या शपथा घेऊनही गिते, बागूलसमर्थक नगरसेवकांवर गटबाजीचा शिक्का मारून त्यांना पक्षातून काढण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झाला आहे. पक्षाच्या बैठकांचे निरोप न देणे, चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमातून प्रचार करणे आदी उद्योग सुरू झाल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अस्वस्थतेला गिरीश महाजन व प्रभारी जयकुमार रावल यांच्यासमोर वाट मोकळी करून देत नगरसेवक व आमदारांच्या तक्रारी करण्यात आल्याचे समजते. अशीच स्थिती काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची होत असून, त्यांच्यावर गटबाजीचा शिक्का मारला जात आहे. भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांच्या या अडगळीत टाकण्याच्या मोडस ऑपरेंडीमुळे हैराण झालेले नगरसेवक थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करण्याच्या मानसिकतेत आहेत. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

शिवसेनेतही बदनामीचे षडयंत्र 

भाजपप्रमाणेच शिवसेनेतही काही नगरसेवकांच्या माथी मनसेचे शिक्के मारून पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर असलेला विश्‍वास डळमळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१७ च्या निवडणुकीत मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या व निवडून आलेल्या नगरसेवकांवर मनसेत प्रवेश करणार असल्याचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवून बदनाम केले जात असल्याचा आरोप होत आहे. यामागे आगामी निवडणुकीत पत्ते कट करण्याबरोबरच येत्या काळात महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्याची रणनीती शिवसेनेत आखली जात असल्याचे बोलले जात आहे.  

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.