फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..!

क्राईम www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो

माणूस जेव्हा आर्थिक चक्रव्यूहात अडकतो तेव्हा त्याला समोर जो पर्याय दिसेल त्याचा कोणताही विचार न करता तो त्या चक्रव्यूहात अडकत जातो. हॅकर्ससुद्धा फेक फायनान्स कंपन्यांचा आधार घेऊन लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना कमीत कमी वेळात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवतात. कोविड काळात अशा फेक फायनान्स कंपन्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. कारण पूर्वीसारखी कर्ज मंजूर होण्यासाठी मोठी वेळखाऊ प्रक्रिया असणारे कर्ज आता मिळत नाही. काही कागदपत्रांची पूर्तता आणि रक्कम लगेचच तुमच्या खात्यावर जमा होते. म्हणून आर्थिक चणचण भासल्यावर सर्वसामान्य माणूस फायनान्स कंपनीचा कर्ज मिळवण्यासाठी आधार घेत असतात.

फसवणूक कशी टाळाल?
व्हॉट्सअ‍ॅपवर 10 मिनिटांत कर्ज मिळेल अशी जाहिरात केली जाते. जाहिरातीखाली नावाजलेल्या कंपनीची वेबसाइट लिंक पाठवली जाते. नावाजलेल्या कंपनीची जाहिरात म्हटल्यावर आंधळेपणाने लोक त्यावर विश्वास ठेवतात. वेबसाइट ओपन झाल्यानंतर माणूस लगेचच त्याला बळी पडण्याची दाट शक्यता असते. अशावेळी ती वेबसाइट फेक असू शकेल याचा विचार करण्याच्या मनस्थितीत माणूस नसतो, तर त्याला लगेचच कर्ज मिळेल आणि गरजा भागतील, असा विश्वास असतो. वेबसाइट ओपन झाल्यानंतर तिथे एक अर्ज आणि सोबत पॅनकार्ड, आधारकार्ड, पेमेंट स्लिप जोडा असा पर्याय दिसतो. सर्व माहिती, कागदपत्रे सबमिट केल्यानंतर एक मेसेज येतो. आमचे कर्मचारी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला फोन करतील. समोरून फोनही येतो. अर्जावरील माहिती विचारली जाते आणि प्रोसेसिंग फी भरावी लागेल म्हणून समोरून सांगितले जाते. कर्ज म्हटल्यावर प्रोसेसिंग फी आलीच. तीन हजार रुपये प्रोसेसिंग फी भरून कर्ज मंजूर होऊन कर्जाची रक्कम खात्यावर जमा होईल याची वाट बघितली जाते. दिवसाचे महिने होऊन जाता तरी कर्जाची रक्कम काही केल्या खात्यावर जमा होत नाही. संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल केल्यावर समजते की लोन अ‍ॅप्लिकेशनची कोणतीही माहिती कंपनीकडे नाही. सर्व शक्यता पडताळून बघितल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली जाहिरात नीट बघितल्यावर समजते की, कंपनीचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले आहे. बजाजच्या ऐवजी तिथे बजाजी नावाचा उल्लेख केलेला दिसतो. वेबसाइटवर कोणताही डिटेल मजकूर नसतो. दोन पानी अर्ज केवळ तेवढा साइटला दिसतो. फसवणूक तर झालेली असते, पण त्याचा काही उपयोग नसतो. कारण तोपर्यंत उशीर झालेला असतो. यालाच ‘फिशिंग’ असे म्हटले जाते. तत्काळ कमीत कमी व्याजदारात कर्ज, झीरो प्रोसेसिंग फी अशा आमिषाला बळी पडू नका. कितीही आर्थिक अडचण असली तरी पूर्णपणे खात्री करूनच कर्ज घ्या. आंधळेपणाने कोणत्याही जाहिरातीवर विश्वास न ठेवता क्रॉस व्हेरिफिकेशन करा.

The post फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..! appeared first on पुढारी.