नाशिक : पुढारी वृत्तसेवा – फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने फ्लॅटधारक महिलेची फसवणूक करीत तिच्याकडून १० लाख रुपये घेतल्याप्रकरणी, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करत दोन वकिलांसह इतर तिघांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नाशिक बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे यांच्यासह ॲड. सुभाष बोडके व इतर तिघांविरोधात फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ॲड. वैभव शेटे यांच्या कार्यालयात घडला प्रकार
तिडके कॉलनी येथील रहिवासी समीना वली सय्यद शेख (६०) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी सीबीएस येथील सम्राट हॉटेलमागील स्पेस टॉवर येथील शेटे यांच्या कार्यालयात हा प्रकार केला. संशयित ॲड. शेटे हे स्वत: समीना यांच्याकडील मालमत्ता खरेदी करणार होते. ॲड. शेटे यांनी समीना यांना त्यांच्या कार्यालयात बोलवून विसार पावती केली. मात्र, त्यावर शेटे यांच्याऐवजी रोहन नवले व आदित्य नवले यांची नावे होती. दोघांच्या नावे समीना यांना चार लाख रुपयांचे धनादेश टोकन म्हणून देण्यात आले. मात्र, ते धनादेश बँकेत वटले नाहीत. ही सर्व कागदपत्रे ॲड. सुभाष बोडके यांनी बनवल्याचे समीना यांनी फिर्यादीत म्हटले आहे. समीना यांनी व्यवहारास नकार दिल्याने संशयित शिबू जोस याच्या मदतीने शेटे यांनी समीना यांना धमकावले. तसेच आम्ही सांगितल्याप्रमाणेच व्यवहार करावा लागेल, असे सांगून बळजबरीने स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर विसार पावती ऐवजी साठेखत असा उल्लेख केल्याचे समीना यांना दिसले. तसेच धनादेश न वटल्याने त्यांनी कागदपत्रांतील धनादेशाचा उल्लेख असलेली पाने फाडून त्यावर आरटीजीएसने पैसे दिल्याचे उल्लेख असलेल्या मजकुराचे पान चिकटवले. दरम्यान, समीना यांचा मुलगा शम्स सय्यद यास २२ मे रोजी कार्यालयात बोलवून घेत संशयितांनी त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच दुसऱ्या दिवशी रोहन व आदित्य नवले यांनी समीना यांच्या घरी जाऊन घर खाली करण्याची धमकी देत घरातील वस्तू फेकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी संशयित शिबू जोस यास अटक केली असून, न्यायालयाने त्यास शुक्रवार (दि.२२)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बळजबरीने १० लाख उकळले
समीना यांनी व्यवहार न करण्याचे सांगितल्यानंतर संशयित शिबू जोस याने त्यांना दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी देत १० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. तसेच ॲड. शेटे यांनी पुणे येथील गुंडामार्फत धमकावल्याचेही समीना यांनी आरोप केले आहेत.
न्यायप्रणालीवर विश्वास
यात आम्ही कोणतीही फसवणूक केलेली नाही. याआधी मी पोलिसांकडे याबाबत जबाब दिला आहे. दरम्यान, हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असून, पोलिसांनी फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल केला आहे. माझा न्यायप्रणालीवर विश्वास आहे. – ॲड. वैभव शेटे, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा बार असोसिएशन
हेही वाचा: