फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : स्थलांतरित पक्ष्यांचे माहेघर तसेच रामसरचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुमारे साडेतीनशे ते चारशे ‘फ्लेमिंगो’च्या थव्याने मुक्काम ठोकला आहे. ऐन पावसाळ्यात ‘फ्लेमिंगो’चे नांदूरमध्यमेश्वर आगमन झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. दोन-तीन महिन्यांआधीच ‘फ्लेमिंगो’ने हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात हिवाळ्यात देश-विदेशातील हजारो पक्षी दरवर्षी मुक्कामी येतात. विशेषत: सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान फ्लेमिंगोसह विविध प्रजातींचे पक्षी वास्तव्यास येतात. नांदूरमध्यमेश्वर जलाशय पाणथळ असल्याने देशी-विदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीय असते.

हिवाळ्याची चाहूल लागताच फ्लेंमिगोचे नांदूरमध्यमेश्वरला आगमन होते. मात्र, यंदा हिवाळ्यापूर्वीच अर्थात निर्धारित वेळेआधीच फ्लेमिंगोने तळ ठोकला आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे फ्लेमिंगोने ठाणे, उजनी जलाशय, वाशी खाडी, घाटघर आदी ठिकाणांहून नांदूरमध्यमेश्वरला मुक्काम हलविल्याचे चित्र आहे. दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अद्यापही पाणथळ क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ‘फ्लेमिंगो’चे आगमन झाल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे.

यंदा पहिल्यांदाच पावसाळ्यात फ्लेमिंगोचे नांदूरमध्यमेश्वरला दर्शन झाले आहे. दरवर्षी सप्टेंबरनंतर फ्लेमिंगो येतात. मात्र, सध्या अभयारण्यातील जलायशात पाणी कमी असल्याने पक्ष्यांसाठी पाणथळ जागा शिल्लक आहे. त्यामुळेच फ्लेमिंगो येथे थांबले असल्याचा अंदाज आहे.

– शेखर देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्‍वर पक्षीअभयारण्य

मागील हंमागात दर्शन दुर्लभ

फ्लेमिंगो हे भारतातील सर्वांत सुंदर स्थलांतरित पक्ष्यांपैकी एक आहे. फ्लेमिंगो ही जगातील सर्वांत व्यापक प्रजाती आहेत. भारतीय उपखंड हे ग्रेटर फ्लेमिंगोचे सर्वांत मोठे प्रजनन केंद्र असून, प्रत्येक हिवाळ्यात भारतात येतात. मात्र, मागील हंगामात फ्लेमिंगोचे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दर्शन दुर्लभ झाले होते.

हेही वाचा :

The post फ्लेमिंगो दोन महिने आधीच नांदूरमध्यमेश्वरला, ऐन पावसाळ्यात प्रथमच आगमन appeared first on पुढारी.