बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार

आदित्य ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी बंड आणि उठाव केला नाही तर त्यांनी गद्दारीच केली, असे ठणकावून सांगत बंड, उठाव हा समोरासमोर करायचा असतो. परंतु, जे गेले ते कधीच शिवसैनिक नव्हते. खरे शिवसैनिक असते तर गद्दारी कधीच केली नसती. हिंमत आणि थोडीफार लाज उरली असेल तर त्या गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जावे, असे खुले आव्हान युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.21) नाशिक येथे दिले.

शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर युवा सेना नेते तथा माजी पर्यटनमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद दौरा आयोजित केला आहे. या दौर्‍यात त्यांनी नाशिक येथे मेळावा घेत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सलग दोन शस्त्रक्रिया झाल्या. याच काळात हे गद्दार जमवाजमव करत डाव साधत होते. दिवाळीच्या आसपास हे सर्व नाट्य सुरू झाले. मात्र, आम्ही नको तितके प्रेम आणि विश्वास ठेवल्याने असे काही होईल, यांची कल्पनाही कधी केली नव्हती, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. राजकारणात सत्य व माणुसकीची गरज निर्माण झाली असून, अशा प्रकारचे राजकारण करण्यासाठीच आपण दौरा आयोजित केला असल्याचे सांगत छोटे-छोटे गट फुटून निर्माण होत असलेले राजकारण आणि सत्ता यामुळे देशात अस्थितरता निर्माण होण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. गद्दारांनी जे केले ते तुम्हाला पटणारे आहे का? अशी विचारणा आदित्य यांनी उपस्थित शिवसैनिकांना करताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी व हात उंचावून शिवसेनेला पाठिंबा दर्शविला.

The post बंडखोर हे गद्दारच : आदित्य ठाकरे, नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेत घेतला समाचार appeared first on पुढारी.