बंड रोखण्यासाठी शिवसेनेने थोपटले दंड

शिवसेना www.pudhari.news

नाशिक : कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ

महापालिका निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी त्याअनुषंगाने सुरू असलेल्या राजकारणाला अधिकाधिक धार चढू लागली आहे. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये तसे आधीपासूनच स्पर्धा आहे. त्यात आता शिंदे गटाची भर पडल्याने निवडणुकीच्या राजकारणाचे पूर्ण सूत्रच बदलून गेले आहे. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मैदानात उतरण्याची पूरेपूर तयारी केली आहे. सुरुवातीला भाजपने ‘एकला चलो रे’ या भूमिकेतूनच महाविकास आघाडीला टक्कर देण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आता शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट निर्माण झालेल्या शिंदे गटाची भाजपला भक्कम साथ मिळणार आहे. त्यातही प्रसंगी सत्ता राखण्यासाठी काही संख्या कमी पडू लागल्यास मनसेही भाजपच्या मदतीला धावून येणार, हे याआधीच्या निवडणुकीतही पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे तसे पाहिल्यास आगामी निवडणूक ही खरे तर शिंदेगट, भाजप आणि शिवसेना यांच्यात रंगणार आहे. त्यासाठीच सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला आत्तापासूनच सुरुवात झाली असून, भाजपकडून शिंदे गटाला शह दिला जात आहे, तर या दोघांनाही प्रतिशह देण्यासाठी शिवसेनेनेही दंड थोपटले आहे. त्याद़ृष्टीनेच नाशिकमधील सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठेचे शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेनेतून शिंदे गटात नाशिक जिल्ह्यातून ना. दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी प्रवेश केला. अवघ्या दोन महिन्यांतच या शिंदे गटाने शिवसेनेला शह देण्यासाठी माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनिल ढिकले, प्रवीण तिदमे अशी काही नावे घेता येतील. ही सुरुवात असून, शिवसेनेतून किमान 15 माजी नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, तिदमे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर फारसा फरक जाणवला नाही. त्यातही शिवसेना कुणाची, यावर अद्याप शिक्कामोर्तब होत असल्याने अनेक जण ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी नाशिकमध्ये शिवसेनेतून मोठे बंड उभे राहील, असे अजिबात वाटत नाही. मुळात शिंदे गटाकडे सत्तेची सूत्रे असली, तरी पक्षाचा कोणताही पाया भक्कम नसल्याने आगामी निवडणुका कशाच्या आधारे लढवायच्या असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडे ओढा निर्माण होण्याचे प्रमाण अत्यंत तुरळक असू शकते. याउलट भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांचे प्रमाण अधिक असू शकते, तर भाजपमधूनही अनेक नाराज आणि महापौर निवडणुकीत बंड पुकारलेल्या 12 नगरसेवकांमधून अनेक जण शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहे. खरे तर होणारे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शिंदे गटाच्या पाठीशी भाजपचाच हात असल्याने, प्रवीण तिदमे यांच्या जाण्याचा वचपा दोनच दिवसांत स्थानिक पदाधिकार्‍यांनी काढत भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांना शिवसेनेत आणण्यात यश मिळविले. आगामी निवडणुकीच्या द़ृष्टीने भाजपमध्ये काही माजी नगरसेवक, माजी आमदारांच्या प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात शिवाजी चुंभळे व त्यांचे कुटुंबीय, पल्लवी पाटील तसेच महापौर निवडणुकीच्या वेळी बंडखोरीचा मार्ग पत्करलेल्या काही नगरसेवकांच्या समावेशाची शक्यता आहे. माजी आमदार अपूर्व हिरे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपमधील शशिकांत जाधव आणि विशाल संगमनेरे या माजी नगरसेवकांबद्दलही मध्यंतरी शिवसेनेत जाण्याबाबतची चर्चा होती. परंतु, राज्यात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन घडून आल्यामुळे या दोघांचा मुक्काम भाजपमध्येच राहणार असल्याचे बोलले जात आहे. शेवटी आयाराम गयाराम यांच्या द़ृष्टीने सत्ताच महत्त्वाची असते, हे तत्त्व इथेही लागू होते.

बडगुजर यांचा गाढा अभ्यास :

शिवसेना महानगरप्रमुख पदाबरोबरच नाशिक मनपातील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरही शिंदे गटाचे प्रवीण तिदमे आणि शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्याकडून दावा केला जात आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार्‍या संघटनेत राजकारण सुरू झाल्याने त्यात कोण बाजी मारतोय, याकडे लक्ष लागून आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत त्या जागी बडगुजर यांची नियुक्ती केली आहे. बडगुजर यांनी माजी सभागृह नेता, विरोधी पक्षनेता ते शिवसेना महानगरप्रमुख या पदापर्यंत मजल मारली आहे. महापालिकेतील एक अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय अंगांची त्यांना अगदी जवळून माहिती असल्याने त्यांच्या ज्ञानाचा कर्मचारी, कामगारांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

हेही वाचा:

The post बंड रोखण्यासाठी शिवसेनेने थोपटले दंड appeared first on पुढारी.