
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानाच्या पोटात चावी आढळून आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या या बंदीवानाच्या पोटात किल्ली आढळल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. संबंधित बंद्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, बंदीवानापर्यंत चावी कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विजय रामचंद्र सोनवणे (४४) असे बंदीवानाचे नाव आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात विजयच्या पोटात दुखत असल्याने कारागृह रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. वैद्यकीय तपासणीत विजयच्या पोटात किल्ली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी विजयने ही किल्ली गिळल्याचा संशय वर्तवला जात आहे. त्यामुळे कारागृहात असलेल्या बंदीवानापर्यंत चावी कशी पोहोचली, चावी कोणत्या कुलपाची आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच या घटनेने पुन्हा कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहेे. विजयने चावी का गिळली, इतके दिवस तो शांत का राहिला, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार ३० ऑक्टोबर २०२३
- राज्यात 18 ठिकाणी उद्योग भवन उभारणार : उदय सामंत
- मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक
The post बंदीवानाच्या पोटात आढळली चावी, कारागृहात खळबळ appeared first on पुढारी.