‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे बक्षीस हेदेखील लाचेचाच प्रकार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे. (Nashik Bribe)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर जिल्ह्यात एमआयडीसीतल्या सहायक अभियंत्यासह तत्कालीन अधिकाऱ्याला एक कोटी रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ‘संशयितांनी फिर्यादी यांच्या कामाच्या बिलाचे व यापूर्वी दिलेल्या काही बिलांचे बक्षीस म्हणून एक कोटी रक्कम स्वत:सह तत्कालीन उपविभागीय अभियंत्यासाठी स्वीकारली’, असा उल्लेख आहे. यापूर्वीही काही गुन्ह्यांमध्ये बक्षीस शब्दाचा प्रयोग केला आहे. कारण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाऱ्या तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही लाचखाेर बक्षीस स्वरूपात लाच मागत असल्याचे समोर आले. त्यामुळे विभागाने बक्षीस शब्दाला रडारवर घेतले आहे. गुन्हा दाखल करताना फिर्यादीतही बक्षीस म्हणून लाच घेतल्याची नोंद केली जात आहे. (Nashik Bribe)

खासगी व्यक्तींचाही लाच घेण्यात वाटा (Nashik Bribe)

चालू वर्षात राज्यामध्ये सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे नाशिक परिक्षेत्रात दाखल झाले आहेत. राज्यात लाच घेणे, मागितल्या प्रकरणी ७११ गुन्हे दाखल असून, त्यापैकी १४२ गुन्हे नाशिक परिक्षेत्रात नोंदविले आहेत. या प्रकरणी २३८ संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच लाच घेताना शासकीय अधिकारी – कर्मचारी खासगी व्यक्तींचा वापर करत असल्याचेही कारवाईतून समाेर आले आहे. त्यानुसार चालू वर्षात राज्यात १५० खासगी व्यक्तींविरोधात लाचखोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच वर्ग एकचे ७०, वर्ग दोनचे १२३ अधिकारी, वर्ग तीनचे ५२०, वर्ग चारचे ३९ आणि इतर लोकसेवकांतील ९३ संशयितांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

शासकीय काम करताना त्याचा मोबदला म्हणून पैसे घेतल्यास ती लाच स्वरूपात गणली जाते. तसेच बक्षीस म्हणून घेतलेले पैसे, वस्तू हेही लाच म्हणूनच ओळखले जाते. तक्रारदारांनी त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून काही देऊ नये. तसेच कोणी लाच मागत असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ यावर तक्रार करावी.

– शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

हेही वाचा :

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.