बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी

फराळविक्री,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

दिवाळी हा सण विविध प्रकारच्या फराळांच्या पदार्थांसाठीही ओळखला जातो. विशेषतः महिलांमध्ये फराळाची लगबग दिसते. जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बचतगट हे फराळ तयार करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पंचायत समितीच्या आवारात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या बचतगटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे फराळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, बचतगटांच्या फराळाला मागणी आहे.

गिरणारे येथील गुरुदत्त महिला स्वयंसहायता समूह, त्र्यंबकेश्वर येथील आधिरा स्वयंसहायता समूह, गोवर्धन येथील सरस्वती महिला स्वयंसहायता समूह यांच्या पथकांनी दिवाळीचा फराळ तसेच दिवाळीला लागणाऱ्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या बचतगटांना शासनाकडून जरी अनुदान नसले, तरी सर्व सदस्य एकत्र आल्यानंतर त्यांचा भांडवलाचा प्रश्न सुटतो आणि शासनाकडून स्टॉल्स वगैरे मिळाल्याने त्यांना विक्रीसाठीही मदत होते.

पूर्वीच्या काळी दिवाळीच्या आठवडाभर आधीच घराघरांत फराळाच्या पदार्थांची लगबग सुरू होत होती. गल्लीत खमंग पदार्थांचा सुवास दरवळत राहायचा. हल्ली काळ बदलला त्यामुळे हे चित्रदेखील बदलले आहे. नोकरदार महिला, व्यावसायिक महिला तयार फराळाला पसंती देतात. त्याचाच फायदा या बचतगटांना होत असतो. बचतगटांच्या माध्यमातून करंजी, चकली, चिवडा, शंकरपाळी, रवा लाडू, बुंदी लाडू, बेसनचे लाडू सोबत चिरोटे, अनारसे असे नानाविध पदार्थ तयार केले जातात.

अनेक विक्रेत्यांनीही ग्राहकांची गरज ओळखून, त्यांना हवा तेवढा फराळ उपलब्ध करून दिला आहे. अगदी 250 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत याचे दर आहेत. महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून एकत्रितपणे ऑर्डर घेऊन महिलांना विविध पदार्थांच्या ऑर्डर दिल्या जातात. शहरात विविध ठिकाणी महिला बचतगटामार्फत तयार केलेल्या फराळाचे स्टॉल लावण्यात आले आहेत, तर काही महिला घरूनच फराळ तयार करून विक्री करत आहेत. या माध्यमातून महिलांनाही दिवाळीनिमित्त रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून आम्ही पंचायत समितीच्या आवारात फराळविक्रीचे काम करत आहोत. यामध्ये शासनाकडून आम्हाला प्रशिक्षण आणि विक्रीकरता जागा मिळाली आहे. आम्हाला यातून चांगली उलाढाल झाली आहे.
– देवयानी पाटील, सरस्वती महिला स्वयंसहायता समूह

हेही वाचा :

The post बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी appeared first on पुढारी.