बड्या थकबाकीदारांवर जिल्हा बँकेची कारवाई; ट्रॅक्टर लिलावातून १६ लाख वसूल 

सटाणा (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसुलीकरिता कठोर पावले उचलून धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत बागलाण तालुक्यातील बड्या आणि प्रभावशाली असलेल्या तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या सभासद थकबाकीदारांच्या जप्त करण्यात आलेल्या सात ट्रॅक्टरच्या लिलावास बुधवारी (ता. १०) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लिलावानंतर बँकेला थकबाकीपोटी १६ लाख पाच हजारांची रक्कम मिळाली आहे. जिल्हा बँक सध्या आर्थिक संकटात आहे. थकबाकीचे प्रमाण वाढल्याने बँक प्रशासनासमोर थकीत कर्जवसुलीचे मोठे आव्हान आहे. बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनातर्फे कठोर पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गत बँकेने धडक मोहीम राबवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या नियम १९६१ नुसार जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीच्या कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

बागलाण तालुक्यातील मोठ्या थकबाकीदारांकडून सात ट्रॅक्टरची जप्ती केली होती. २००९ ते २०११ या कालावधीतील हे मोठे सभासद बँकेचे थकबाकीदार असून, बँक प्रशासनाने थकीत कर्जवसुलीसाठी त्यांना सातत्याने नोटिसा बजावल्या. सौजन्याने मागणीही केली होती. मात्र त्यांनी थकीत कर्ज रकमेचा भरणाच न केल्याने बँक प्रशासनाने जप्तीची कारवाई केली होती. तालुक्याचे सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांनी या ट्रॅक्टरचे मूल्यांकन केल्यानंतर इजमाने (ता. बागलाण) येथे त्यांचा लिलाव करण्यात आला. लिलावप्रक्रियेस प्रतिसाद मिळाला. बँकेचे कक्ष अधिकारी पी. डी. शेवाळे, पालक अधिकारी बबनराव गोडसे, विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे, निरीक्षक बी. एन. सूर्यवंशी, एच. एल. भामरे, तुषार अहिरे, ए. के. खैरनार, एस. व्ही. भामरे, व्ही. डी. धोंडगे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

सहकार्य करण्याचे आवाहन 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जुन्या थकबाकी वसुलीसाठी नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली. या योजनेंतर्गत थकबाकीदारांना कर्जात भरघोस सवलत दिलेली आहे. याव्यतिरिक्त योजनेस येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. त्यामुळे जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून लवकरात लवकर थकबाकीचा भरणा करावा आणि बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळातर्फे करण्यात आले.