बनावट दस्ताऐवजाने करोडोची जमीन हडप; तीन गुन्हे उघडकीस 

मालेगाव (जि.नाशिक) : शहरात बनावट आधारकार्ड, दस्ताऐवज व मुद्रांक तयार करून करोडो रुपयांच्या जमिनी हडप करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत असे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. पोलिसांनी तिन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. 

मालेगावात दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल
सायने बुद्रुक शिवारात शेतजमिनीसंदर्भात मूळ मालकाच्या जागी दुसरी व्यक्ती दुय्यम उपनिबंधक कार्यालयात उभे करून खोटे आधारकार्ड, खोट्या स्वाक्षऱ्या व खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक केली. या प्रकरणी उज्ज्वल भामरे व केशव या दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वऱ्हाणेपाडा (ता. मालेगाव) येथील जमिनीसंदर्भातदेखील मूळ मालकाच्या जागी दुसरा व्यक्ती दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करण्यात आला. २१ जुलै २०२० ला खोटे दस्ताऐवज करून दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रसाद हरिभाऊ पाटोळे (४२,रा. नाशिक), भारती मेघश्‍याम तारू (सोयगाव), प्रदीप रमेश महाजन (४५, सिडको, नाशिक), नरेंद्र मुरलीधर भावसार (४५, मालेगाव) व अन्वर खान मकबुल खान (३५, मालेगाव) यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

तीन गुन्हे उघडकीस 
संगमेश्‍वरातील जमीन परस्पर हडप करण्याचा प्रकार उघड झाला. बोगस बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्ड, खरेदी-विक्रीचे बनावट दस्ताऐवज तयार करुन दुय्यम निबंधक कार्यालयात देण्यात आले. या प्रकरणी सरला योगेंद्र चौधरी (३४, संगमेश्‍वर), कांचन रवींद्र महाले (३२, संगमेश्‍वर), अर्जुन अशोक भाटी (३२, मालेगाव), गणेश रितीभानसिंह (२१, बालापूर, उत्तर प्रदेश), शफीकुर रहेमान अब्दुल मजीद (६७, इस्लामपुरा, मालेगाव), भाऊसाहेब अर्जुन सूर्यवंशी (५४, चंदनपुरी) व गणेश शिंदे (४६, मालेगाव) यांच्याविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्ताऐवजाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशा लोकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO